scorecardresearch

लक्षणे नसलेल्या रुग्णांची शल्यक्रियेपूर्वी करोना चाचणी

करोनेतर रुग्णांमध्ये एकही लक्षणे नसल्यास त्याची करोना चाचणी करू नये, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारितील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ !

महेश बोकडे

नागपूर : करोनेतर रुग्णांमध्ये एकही लक्षणे नसल्यास त्याची करोना चाचणी करू नये, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारितील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिल्या आहेत. त्यानंतरही राज्यातील वैद्यकीय शिक्षण खात्याच्या रुग्णालयांत रुग्णांची सक्तीने चाचणी केली जात आहे.

केंद्र व राज्य शासनाचे कोविड टास्क फोर्स, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेसह इतर सर्वोच्च वैद्यकीय संस्थांकडून रुग्णांवर उपचारासह घ्यायच्या काळजीबाबत मार्गदर्शक सूचना काढल्या जातात. याच क्रमात आयसीएमआरने १० जानेवारी २०२२ रोजी करोनाच्या तपासणीबाबत एक मार्गदर्शक पत्र काढले. त्यात विविध रुग्णालयांमध्ये एकही लक्षणे नसलेले रुग्ण आल्यास जोखमेतील सोडून इतरांची करोना चाचणी करू नये, प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल महिलेत लक्षणे नसल्यास चाचणी करू नये, शल्यक्रियेपूर्वी लक्षणे नसलेल्यांची शस्त्रक्रिया करू नये अशा सूचना आहेत. परंतु नागपुरातील मेडिकल, मेयोसह सर्व वीसहून अधिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत मात्र शस्त्रक्रियेची गरज असलेल्या व एकही लक्षणे नसलेल्या रुग्णांची करोना चाचणी सक्तीने केली जात आहे. त्यात कुणाला करोनाची बाधा असल्याचे निदर्शनात आल्यास व त्याला तत्काळ शस्त्रक्रियेची गरज नसल्यास रुग्णाला कोविड वार्डात हलवले जाते. त्यामुळे या रुग्णांवरील शस्त्रक्रिया आठवडय़ाभर लांबणीवर पडते. चाचणीचा भरुदड रुग्णांवर पडत नाही. परंतु चाचणीवर होणाऱ्या खर्चाचा नाहक भार शासनाला सोसावा लागत आहे.

खासगी रुग्णालयांतही लूट!

नागपूरसह राज्यातील अनेक खासगी रुग्णालयांतही शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची वा प्रसूतीपूर्वी महिलेची करोना चाचणी होत आहे. अहवालानंतरच शस्त्रक्रियेबाबत वा प्रसूतीबाबतचे नियोजन होते. या चाचण्यांच्या खर्चाचा भारही रुग्णांवर टाकला जातो. त्यामुळे रुग्णांची लूट होत आहे.

मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सर्व रुग्णालयांत केली जाते. लक्षणे नसलेल्या रुग्णांची शस्त्रक्रियेपूर्वी चाचणी करू नये अशा सूचना आल्यास तत्काळ त्यावर अंमलबजावणी केली जाईल.

– डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona test before surgery asymptomatic patients ysh