नागपूर : जिल्ह्य़ात करोना, म्युकरमायकोसिस (काळी बुरशी), डेंग्यूनंतर सर्दी, खोकला, तापाचे (व्हायरल) रुग्णही घरोघरी वाढलेले दिसत आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त होत असतानाच सर्दी, खोकला, ताप या करोनाच्या लक्षणाच्या चाचण्या वाढणे अपेक्षित होते. पण याउलट जिल्ह्य़ात चाचण्यांची संख्या घसरल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, खासगी डॉक्टरांकडून या रुग्णांना चाचण्याचा सध्या सल्लाही दिला जात नसल्याचे बरेच रुग्ण सांगतात. त्यामुळे पुन्हा करोनाची लाट आल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

जिल्ह्य़ात सध्या करोना नियंत्रणात असून दैनिक रुग्णसंख्या खूपच कमी दिसत आहे. परंतु घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढल्यावरही जिल्ह्य़ात करोना चाचण्यांची घटती संख्या चिंता वाढवत आहे. कारण ही सर्व लक्षणे करोनाची आहेत. तूर्तास शहरातील करोना चाचण्यांच्या सकारात्मकतेचा अहवाल खूपच कमी आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक संशयिताची चाचणी व विलगीकरण, शारीरिक अंतर, मुखपट्टीचे नियम पाळणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्य़ात मुखपट्टी, शारीरिक अंतराच्या नियमाला फाटा दिल्या जात असतानाच सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांच्याही चाचण्यांसाठी अनेक खासगी डॉक्टरांकडून टाळाटाळ होत आहे.

नागपूर शहरात १ नोव्हेंबरला १ हजार २०९, ग्रामीणला ७३ अशा एकूण केवळ १,२८२ संशयितांच्याच करोना चाचण्या झाल्या. ३१ ऑक्टोबरला ही संख्या जिल्ह्य़ात २,६८७ तर ३० ऑक्टोबरला २,६८७ चाचण्या होती. त्यामुळे संशयितांच्या चाचण्या कमी होत असल्याने स्पष्ट होते. दरम्यान, जिल्ह्य़ात सध्या डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण आढळण्याचे प्रमाणही अधिक आहे. तर तूर्तास घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढल्याने येथील मेडिकल, मेयोसह खासगी रुग्णालयांत या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता या रुग्णांची करोना चाचणी अपेक्षित आहे. परंतु शहरातील अनेक खासगी डॉक्टरांकडून या चाचणीचा सल्लाच रुग्णांना दिला जात नाही. त्यातच प्रशासनाकडून करोनाच्या रुग्णांना उपचारासाठी विलगीकरणात उपचाराची अजब सक्ती केली गेली आहे. त्यामुळे करोनाचा अहवाल मिळाल्यास तेथे उपचार टाळण्यासाठीच चाचण्या होत नसल्याचे बरेच नातेवाईक सांगतात.

करोना व डेंग्यूची स्थिती

जिल्ह्य़ात १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत करोनाचे ४ लाख ९३ हजार ४५७ रुग्ण आढळले असून त्यात शहरातील ३ लाख ४० हजार ३७३, ग्रामीणच्या १ लाख ४६ हजार १९७, जिल्ह्य़ाबाहेरील ६ हजार ८८७ रुग्णांचा समावेश आहे. पैकी शहरात ५,८९३, ग्रामीणला २,६०४, जिल्ह्य़ाबाहेरील १,६२४ अशा एकूण १०,१२१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहरात ३ लाख ३४ हजार ४५६, ग्रामीणला १ लाख ४३ हजार ५८५, जिल्ह्य़ाबाहेरील ५,२६२ असे एकूण ४ लाख ८३ हजार ३०२ व्यक्ती करोनामुक्त झाले. तर सध्या शहरात २४, ग्रामीणला ८, जिल्ह्य़ाबाहेरील २ असे एकूण ३४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर जिल्ह्य़ात २१ ऑक्टोबपर्यंत डेंग्यूचे २ हजार ६३ रुग्ण आढळले. त्यात शहरातील ८५३, ग्रामीणचे १ हजार २१० रुग्णांचा समावेश आहे. पैकी उपचारादरम्यान शहरात ५, ग्रामीणला ५ असे जिल्ह्य़ात १० मृत्यूही झाले.

प्रशासनाच्या यशस्वी प्रयत्नाने सध्या जिल्ह्य़ात करोना नियंत्रणात असून डेंग्यूचेही रुग्ण कमी झाले आहे. व्हायरलचे रुग्ण वाढले असले तरी प्रत्येक डॉक्टरांनी संबंधित रुग्णाचा इतिहास घेत त्याची चाचणी करायला हवी. शेवटी जिल्ह्य़ात पुन्हा या आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. सोबत प्रत्येक नागरिकांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुखपट्टी, शारीरिक अंतरासह शासनाने सांगितलेले नियम पाळायला हवे. – डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर</p>