अकोला : नववर्षाच्या सुरुवातीला कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कोविड-१९ चे तीन सक्रिय रुग्ण आढळून आले. त्यांना गृहविलगीकरणात ठेवून उपचार केले जात आहेत. नागरिकांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जेएन-१ उपप्रकाराचा रुग्ण जिल्ह्यात आढळून आला. त्यानंतर आणखी करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे दोन पुरुषांना करोनाची लागण झाली असून, त्यांचे वय २८ व ४२ वर्षे आहे. जिल्ह्यातील एक ३८ वर्षीय महिला अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात दुर्गवाडा येथे कोविडबाधित आढळल्याने तिथेच गृहविलगीकरणात उपचार घेत आहे. महापालिका क्षेत्रात कोविड-१९ सकारात्मक रुग्ण आढळून आला. त्या रुग्णास सौम्य लक्षणे होती. त्यामुळे गृहविलगीकरणात उपचार करण्यात आले. हा रुग्ण जेएन-१ उपप्रकारामध्ये सकारात्मक असल्याची माहिती २४ डिसेंबर रोजी प्राप्त झाली. सद्य:स्थितीत हा रुग्ण बरा असून त्यास कोणतीही लक्षणे नाहीत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

हेही वाचा – सामाजिक न्याय विभागात बदली नियमाला तिलांजली! अनेक अधिकारी ९ वर्षांपासून एकाच विभागात

सर्व आरोग्य संस्थांमध्ये श्वसन आजार व तत्सम लक्षणे आढळल्यास नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवणे, योग्य उपचार देणे आदी प्रक्रिया केली जात आहे. नागरिकांनीही हातांची स्वच्छता, गर्दीत मुखपट्टीचा वापर, सर्दी, ताप, खोकला व अंगदुखी यासारखी लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा

करोना प्रकोपाचा पूर्वानुभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी कीट उपलब्ध ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले. कोविड-१९ च्या नव्याने उद्भवलेल्या उपप्रकाराच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन कोविड कक्ष, प्राणवायू प्रकल्प, चाचणी प्रयोगशाळेची पाहणी केली. अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये उपस्थित होत्या.