प्रशिक्षण आटोपून नागपुरात आले होते

नागपूर : पुणे येथील पोलीस अकादमीत प्रशिक्षणासाठी गेलेल्या नागपुरातील ३३ पैकी १२ पोलीस कर्मचाऱ्यांना करोना विषाणूची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या सगळ्यांना उपचारासाठी आमदार निवासात विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा आरोग्य विभागाकडून शोध सुरू आहे.

नागपूर पोलीस दलातील गुप्त वार्ता, विशेष शाखासह इतर विभागातील एकूण ३३ पोलीस कर्मचारी पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी १० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. हे सर्व कर्मचारी ३० ऑगस्टला पुण्याला गेले होते. तर १० सप्टेंबरला तेथून नागपुरात परतले. यात प्रशिक्षण आटोपल्यावर एका पोलीस कर्मचाºयाला ताप आणि सर्दी खोकला यासारखी सौम्य लक्षणे जाणवली. तो  पोलीस रुग्णालयात गेला असता त्याला करोना चाचणी करण्याची सूचना करण्यात आली. त्याचा अहवाल शनिवारी सकारात्मक आला. त्यानंतर पुण्याला गेलेल्या इतरही पोलीस कर्मचाऱ्यांची चाचणी केली गेली. त्यात रविवारपर्यंत १३ कर्मचाऱ्यांना विषाणूची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व रुग्णांना आमदार निवास येथे उपचारासाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसह कर्मचारी-अधिकाऱ्यांची माहिती मिळवली जात असून त्यांच्याही करोना चाचण्या करण्यात येणार आहे. करोनाग्रस्त आढळलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे पुढे आले आहे. सगळ्यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.