|| महेश बोकडे, लोकसत्ता
रुग्णालयाच्या इमारतीतच सांस्कृतिक समारंभ; मुखपट्टी, शारीरिक अंतराचे नियम धाब्यावर

नागपूर : तिसऱ्यालाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील १५ एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाली आहे. ही घटना ताजी असतानाच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) ११ सप्टेंबरला विद्यार्थ्यांनी रुग्णालयाच्या इमारतीतच गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक महोत्सव भरवत मुखपट्टी व शारीरिक अंतरासह शासनाच्या नियमांना तिलांजली दिली. यावेळी एकीकडे डीजेच्या आवाजाने तर दुसरीकडे बराच वेळ विविध शुल्क भरण्याचे काऊंटर बंद ठेवून रुग्णांसह नातेवाईकांना मनस्ताप दिला गेला. त्यामुळे एम्सच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नागपूरसह मध्य भारतात करोनाचा शिरकाव झाल्यावर ‘एम्स’ रुग्णालय प्रशासनानेही करोना नियंत्रणासाठी पुढाकार घेत प्रथम आरटीपीसीआर चाचणीची अद्यावत प्रयोगशाळा व त्यानंतर उपचारासाठी विशेष वॉर्ड उभारून रुग्णसेवा सुरू केली. तर आता करोनाचे रुग्ण कमी झाल्यावर येथे गैरकरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने बाह्यरुग्ण विभागासह आंतररुग्ण विभागातही मोठ्या संख्येने उपचाराला येत आहेत. शनिवारी एम्समधील बाह्यरुग्ण विभाग दुपारी १ वाजताच्या सुमारास बंद झाले. त्यानंतर येथे २४ तास आंतरुग्ण विभागाच्या रुग्णांना वेळोवेळी काही शुल्क भरायचे असल्यास त्यासाठीचे काऊंटर सुरू असतात. परंतु येथील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी रुग्णालये ही सायलेंट झोन असतानाही येथेच गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक महोत्सव भरवला.

महोत्सवानिमित्त गणेश मूर्तीची स्थापना मुलांनी वसतिगृहात केली. परंतु कार्यक्रम रुग्णालयाच्या इमारतीत केला गेला. याप्रसंगी शारीरिक अंतरासह मुखपट्टी व इतर नियमांना तिलांजली दिली गेली. सोबत येथील विविध शुल्क भरण्याचे काऊंटर बंद ठेवत नातेवाईकांना येथे प्रवेश प्रतिबंधित करत रोखले गेले. हा सर्व प्रकार युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव बावनकर यांनी मोबाईलमध्ये चित्रित केले. ते एका रुग्णाला दाखल करण्याबाबतच्या प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी तेथे गेले होते. दरम्यान, या इमारतीच्या दुसऱ्यामाळ्यापासून वरच्या माळ्यांवर विविध विभागांचे वार्ड असून तेथे अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होतात. तर या कार्यक्रम स्थळाच्या शेजारीच आपत्कालीन विभाग असून तेथेही अत्यवस्थ रुग्ण येथे आल्यास  प्रथम त्याला डॉक्टर स्थिर करत त्यानंतर त्याला इतर वार्डात हलवतात. येथेही बरेच वार्ड आहेत. त्यामुळे या भागात विद्यार्थ्यांना नियमबाह्य सांस्कृतिक महोत्सव भरवून मोठ्या आवाजात रुग्णांना त्रास होईल अशा पद्धतीने डीजेवर गाणे वाजवण्यासह नृत्याची परवानगी दिली कुणी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. या प्रकाराने एकीकडे रुग्ण वेदनेने विव्हळत असताना दुसरीकडे भावी डॉक्टर नाचत असल्याबद्दल नातेवाईकांच्या मनातही प्रचंड चीड निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

एम्समध्ये ‘एमबीबीएस’ची चौथी बॅच

राज्यातील एकमात्र नागपुरातील एम्समध्ये सध्या एमबीबीएसच्या चौथ्या बॅचला प्रवेश देण्यात आला आहे. या संस्थेच्या सर्वात पहिल्या बॅचचे वर्ग मेडिकल परिसरात ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन भरवण्यात आले होते. तर आता येथे प्रवेश क्षमता १२० विद्यार्थी एवढी झाली आहे.

एम्समधील रुग्णालयाच्या इमारतीत सांस्कृतिक कार्यक्रम घेत मुखपट्टी व शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन होत नसल्याचे बघत धक्काच बसला. दुसरीकडे येथील सर्व कॅश काऊंटर बंद करून तेथे नातेवाईकांना कामासाठी जाण्यास सुरक्षारक्षक प्रतिबंध घालत होते. हा प्रकार योग्य नसून येथे रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी. या प्रकरणाची केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह एम्सच्या बोर्डाकडेही तक्रार करणार आहे.’’ – वैभव बावनकर, युवा सामाजिक कार्यकर्ता.

एम्समध्ये रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार उपलब्ध करण्यासाठी प्रशासन पूर्ण काळजी घेते. शनिवारी येथे सांस्कृतिक कार्यक्रम रुग्णालयाच्या इमारतीत झाला नाही. विद्यार्थ्यांनी केवळ १० मिनिटांसाठी गणपतीच्या निमित्याने थोडी मस्ती केली. याप्रसंगी शासनाचे नियम पाळले गेले. परंतु कुणाला त्रास झाला असल्यास पुढे विशेष काळजी घेतली जाईल.’’

– मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, संचालक, एम्स (नागपूर).