करोनाच्या वाढत्या रुग्णांमुंळे मुंबई, पुणे, अकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील रविवारी जनतेशी संवाद साधताना परिस्थिती पाहून पुढील आठ दिवसांत लॉकडाउनसंबंधी निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यातच आता करोना रुग्ण वाढणाऱ्या नागपुरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दल माहिती दिली आहे.

काय आहेत नवे नियम –
१) कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ७ मार्चपर्यंत बंद ठेवणार.
२) जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा -वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, औषध पेट्रोल पंप वगळून) बंद ठेवणार.
३) आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार ७ मार्चपर्यंत बंद ठेवणार.
४) जिल्ह्यातील हॉटेल (रेस्तराँ) ५० टक्के क्षमतेने रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी.
५) लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम ७ मार्चपर्यंत बंद. परंतु मंगलकार्यालय/ लॉन्स/रिसॉर्ट दिनांक २५ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत बंद राहतील.
६) कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार.
७) करोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आएलटी तसेच सारीची तपासणी करणार.
८) शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रोकन्टोन्मेंट झोन तयार करुन सक्तीने उपाययोजना. हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित

आणखी वाचा- महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय कुलगुरू-जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती; उदय सामंत यांची माहिती

लॉकडाउन नाही, पण निर्बंध अधिक कठोर करणार असल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- माझं कळकळीचं आवाहन की,…; राजेश टोपे यांचं रुग्णालयातून महाराष्ट्राला पत्र

विदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्य़ात आढळत आहेत. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाला चाचण्या वाढवण्यासह रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. करोनाचे सर्वाधिक रुग्ण ३० ते ४० वयोगटातील असून रुग्ण वाढण्याला मुखपट्टी न घालणे, शारीरिक अंतर न ठेवण्यासह बिनधास्त फिरणेच प्रमुख कारण आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक, शिकवणी वर्ग, मॉल्स व इतर व्यावसायिक प्रतिष्ठानातील गर्दीवर लक्ष ठेवून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

याआधी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बाधित वाढत असलेल्या शहरात रात्रीच्या संचारबंदीचा विचार केला जात असून त्याबाबत राज्य सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेषत: औरंगाबाद पुणे, अमरावती, अकोला वर्धा, यवतमाळ आणि नागपूर शहरात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे यातील काही शहरांमध्ये संध्याकाळी सहा ते पहाटेपर्यंत संचारबंदी लावण्याचा विचार सुरू असून त्या त्या जिल्ह्यतील परिस्थितीनुसार तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत असं वडेट्टीवार म्हणाले.