२५ हजार देण्याचा फतवा, अनेकांची नाराजी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये ५ तारखेला होणाऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांच्या शहरातून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहावे यासाठी व त्यांच्या व्यवस्थेसाठी नगरसेवकांनी २५ हजार रुपये देण्याचा फतवा पक्षाने काढला आहे. एवढी रक्कम आणायची कोठून, असा प्रश्न उपस्थित करून काही नगरसेवकांनी ती रक्कम देण्यास नकार दिला आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपने पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ाला किमान ५ ते १० हजार  कार्यकर्ते मुंबईत आणण्याचे लक्ष्य  निर्धारित करून दिले आहे. नागपुरातून या मेळाव्याला जास्तीत जास्त कार्यकर्ते यावेत म्हणून खुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपुरात कार्यकत्यरंचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस यांनी  नागपूर शहरातून किमान १० हजार कार्यकर्ते मुंबईत आणण्याचे आवाहन पक्षाच्या नेत्यांना केले होते.

प्रत्येक नगरसेवकावर  त्यांच्या प्रभागातील कार्यकर्त्यांना मुंबईत नेण्याची आणि तेथे राहण्याची व्यवस्था करायची असून त्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी २५ हजार रुपये पक्षाकडे जमा करावे, अशी सूचना केली आहे. मात्र, काही नगरसेवकांनी पैसे देण्यास नकार दिला आहे. नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर या प्रवासासाठी एका बससाठी ९० हजार रुपये खर्च येतो. मग हा खर्च कसा करायचा, असा प्रश्न नगरसेवकांसमोर पडला आहे. कारवाईच्या भीतीने नगरसेवक उघडपणे याबाबत बोलण्यास तयार नाहीत. खर्च कमी करण्यासाठी कोही नगरसेवकांनी कार्यकर्त्यांना दोन वेळच्या जेवणाचे डबे सोबत घेण्याची सूचना केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शहरातून किमान १० हजार कार्यकर्ते नेण्याचे लक्ष्य असून त्यासाठी पक्षाच्यावतीने प्रयत्न सुरू असल्याचे उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी सांगितले.

आम्ही नगरसेवकांना निधी देण्यासाठी जबरदस्ती केली नाही. स्वच्छेने ते देणार आहेत. कार्यकर्त्यांच्या स्ववस्थेवर हा निधी खर्च केला जणार आहे.

– आमदार सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष, भाजप, नागपूर

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporators bear expenses of bjp rally in nagpur
First published on: 04-04-2018 at 05:04 IST