चरस, गांज्यासाठीचा पर्याय
महाराष्ट्रातील कारागृहे ही अंमली पदार्थ विक्रीचे सर्वात मोठे अड्डे बनल्याची ओरड नेहमीच होते. कैद्यांच्या नशाखोरीचा प्रश्न सर्वच कारागृहांना भेडसावत असताना ‘खोकल्याचे सिरप’ आणि ‘आयोडेक्स’चा कैद्यांकडून होणारा गैरवापर बघता नागपूर मध्यवर्ती कारागृहात या औषधांचे वितरण बंद करण्यात आले आहे. आता त्या ठिकाणी गोळीच्या स्वरूपातील औषधांचे वितरण करण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
काही महिन्यांपूर्वी नागपूर मध्यवर्ती कारागृहात सर्रासपणे चरस, गांजा मिळत असल्याचे अनेक वृत्त प्रसिद्ध होते. एकप्रकारे नागपूर मध्यवर्ती कारागृह हे अंमली पदार्थ विकण्याचा अड्डा झाल्याचा आरोप समाजातून होऊ लागला होता. ३१ मार्च २०१५ च्या मध्यरात्री पाच कुख्यात कैदी पळाल्याने कारागृहाच्या सुरक्षेची लक्तरेच वेशीवर टांगली गेली. त्या घटनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपूरची प्रतिमा देशभर मलीन झाली. त्यामुळे विद्यमान पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीकडून राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनीही नागपूर कारागृहाला भेट देऊन आढावा घेतला असता एका कैद्याकडे गांजा सापडला होता. कारागृहाच्या आतमध्ये चरस, गांजा पोहोचण्याचे मुख्य स्रोत कारागृहाच्या सुरक्षेत असणारे शिपाईच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अकरा अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करून एका शिपायाविरुद्ध धंतोली पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यापूर्वीही अनेक शिपायांविरुद्ध कारागृहात कैद्यांना गांजा पोहोचवणे, मोबाईलसारखी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निलंबित करण्यात आले.
एका मागून एक अशा घटना उघडकीस आल्यानंतर नवीन कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांनी कारागृहाची सुरक्षा अधिकच कडक केली. त्यामुळे कारागृहातील कैद्यांपर्यंत चरस, गांजासारखे अंमली पदार्थ पोहोचण्यावर अंकुश लागला. त्यामुळे अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या कैद्यांनी चरस, गांजाला ‘खोकल्याचे सिरप’ आणि ‘आयोडेक्स’सारख्या औषधांचा पर्याय शोधून काढला. कारागृहातील रुग्णालयात खोकला आणि अंगदुखीच्या कैद्यांचे प्रमाण वाढू लागल्याने प्रशासनाला संशय आला. अधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता कैदी ‘खोकल्याचे सिरप’ आणि ‘आयोडेक्स’ हे नशाखोरीसाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रशासनाने ‘सिरप’ आणि ‘ऑयोडेक्स’ बंद करून त्यासाठी गोळीच्या स्वरूपातील औषध वितरित करण्यात येत असल्याची माहिती आहे.
कारागृह अधीक्षकांचा दुजोरा
यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, कैद्यांचा अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला.