आजवर दूरचित्रवाणीच्या पडद्यावर बघत असलेल्या घटना आता आजूबाजूलाही घडू लागल्याने मोरू सध्या अस्वस्थ झाला आहे. गोरक्षकांचा हिंसाचार, नेत्यांची वक्तव्ये बघून मोरूचे समाधान होण्याऐवजी त्याच्या मनातला गोंधळ वाढतच चालला आहे. या हिंसेच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडत असल्या तरी नागपूर मात्र शांत आहे हे बघून त्याला आजवर हायसे वाटत होते, पण गेल्या आठवडय़ात जलालखेडय़ाच्या घटनेने त्याची झोप उडाली. त्याला कारणही तसेच आहे. मोरूने गाय पाळली आहे. गाय पाळणे ही मोरूची पिढीजात परंपरा आहे. वडिलांनी जाता जाता गायीला अंतर देऊ नको असे वचन मोरूकडून घेतले होते. ते आजवर कशोसीने पाळणारा मोरू सध्या भवतालच्या वातावरणामुळे भलताच अस्वस्थ आहे. मोरू गायीची खूप काळजी घेतो, तिची निगा राखण्यावर बऱ्यापैकी पैसे खर्च करतो, पाळलेल्या गायीवर त्याचे प्रेम आहे. मात्र, सध्या सुरू असलेले गोराजकारण मोरूला मान्य नाही. तो तसा विज्ञानवादी आहे. एक प्राणीमात्र म्हणून गायीची काळजी घेणे ठीकच, पण ती माता आहे, तिचे पूजन करा असले सल्ले मोरूला खपत नाहीत, पण तो पडला मध्यमवर्गीय, त्यामुळे या मुद्यावरून कुणाशी वाद घालणे त्याच्या रक्तातच नाही. परिणामी, पडद्यावर जे दिसते ते बघणे, वृत्तपत्रात जे येते ते वाचणे आणि स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारत राहणे, अगदीच त्रागा झाला तर बायकोपोरांवर डाफरणे हेच सध्या मोरूचे जीवनध्येय झाले आहे. जलालखेडय़ाची घटना घडल्यापासून तो चांगलाच बेचैन झाला आहे. यात मार खाणारा मुस्लीम, त्यातही भाजपचा पदाधिकारी आणि मारणारे भाजपवाले नाहीत तर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते! त्यामुळे या घटनेवरून पुरोगाम्यांकडून जे काहूर माजायला हवे होते ते माजलेच नाही. या घटनेचा खोलात जाऊन जेव्हा मोरू विचार करतो तेव्हा त्याला आणखीच अस्वस्थ व्हायला होते. या देशात हे काय सुरू आहे, असा प्रश्न त्याला पडतो. खरेतर भाजपची विचारसरणी मुस्लीम समुदायाच्या अजिबात पचनी पडणारी नाही. तरीही सर्वत्र सत्ता असलेल्या या पक्षात सध्या अनेक मुस्लीम तरुण जात आहेत. पक्ष व धोरणे आवडायला लागली म्हणून हे तरुण जात नाहीत तर एकप्रकारच्या अगतिकतेतून ते जात आहेत हा मोरूचा निष्कर्ष आहे. गायीच्या नावावर बहुसंख्यकांनी अल्पसंख्याकांच्या मनात निर्माण केलेली भीती सुद्धा या तरुणांच्या सत्तासोबतीमागे आहे. आपल्यावर कुणीतरी हल्ला करेल, आपल्या खाण्यावर संशय घेतला जाईल या शंकेने ग्रासलेला हा अल्पसंख्य तरुण सुरक्षितता मिळावी म्हणून हे पक्षांतर करत आहे. जलालखेडय़ाच्या घटनेत मार खाणारा तरुण वारंवार भाजपचे ओळखपत्र दाखवत होता. हे चांगल्या व सुदृढ समाजस्वास्थ्याचे लक्षण मानायचे का? मोरूच्या मनाला पडलेला हा प्रश्न आहे. गाय पाळणारा असूनही मोरूला कुणी काय खावे, काय प्यावे हे कायदे करून सरकारने ठरवावे असे अजिबात वाटत नाही. या मुद्यावरून होणारा हिंसाचार त्याच्या मध्यममार्गी मनाला पटत नाही. राजकारण करणारे ते करतात, त्यातून फायदे मिळवतात पण जीव सामान्यांचा जातो या अनुभवावर आधारलेल्या गृहीतकावर मोरूचा ठाम विश्वास आहे. या मुद्यावरून एका धर्माला लक्ष्य करणे, त्यांच्यात असुरक्षितता निर्माण करणे, त्यांना अगतिक करणे आणि मग शरण आले की हाताखालचे मांजर बनवून ठेवणे मोरूला पटणारे नाही. गायीचे राजकारण सुरू झाल्यापासून मोरूला एक प्रश्न जबर सतावतोय. गोरक्षेचा जप करणारे कुणीही घरी गाय पाळताना दिसत नाही. जप करण्यापेक्षा एखादी गाय यांनी पाळावीच असे मोरूला राहून राहून वाटते. मध्यंतरी त्याने वार्डातल्याच एका गोरक्षकाला भितभित हे विचारले तर त्याने परिवाराकडून चालवल्या जाणाऱ्या गोशाळांची महती कथन केली. या गोशाळांमधील गायींची अवस्था किती वाईट आहे, ही वाचलेली बातमी मोरूच्या मनात आली पण त्याने या गोरक्षकाशी वाद घातला नाही. सत्तेच्या कैफात असलेल्यांचा काही भरवसा देता येत नाही हे आठवून तो गप्प राहिला. देशाचे सर्वोच्च नेते हिंसाचार करू नका, असे सांगतात तरी तो थांबायला तयार नाही, हे बघून मोरूला वाईट वाटते. याचे सारे मूळ पुन्हा राजकारणात दडले आहे याची जाणीव त्याला सातत्याने होत राहते. एकीकडे हिंसाचार करू नका, असे म्हणायचे व दुसरीकडे गाय राजकारणाचा केंद्रबिंदू कसा राहील, याची तजवीज करत राहायची आणि लोकांची माथी भडकतील अशी वक्तव्ये करणाऱ्यांच्या फौजेला संरक्षण देत राहायचे हा प्रकारही आता मोरूच्या लक्षात यायला लागला आहे. मोरूच्या घरात गेल्या कित्येक वर्षांपासून गाय आहे. आजूबाजूला व परिसरात राहणाऱ्यांच्या दृष्टीने आजवर तो एक दुर्लक्षित प्राणी होता. मात्र, गोप्रेमाला उकळी फुटल्यापासून अनेकांनी या गायीकडे कुतुहलाने बघणे सुरू केले आहे. एक दिवस तर काहीजण गायीची पूजा करायची आहे म्हणून एकदम घरीच येऊन थडकले. हा प्रकार बघून मोरूचा संताप अनावर झाला व त्याने सर्वाना हाकलून लावले. वाऱ्याच्या लाटेबरोबर वाहणारे हे तोंडदेखले लोक मोरूला अजिबात आवडत नाहीत. आता मोरूला नवीच चिंता भेडसावू लागली आहे. त्याची गाय भाकड होऊ लागली आहे. आजवर भाकडीला विकायचे व नवी आणायची ही त्याच्या घराण्याची परंपरा नव्या कायद्यामुळे खंडित होणार आहे. गाय विकायला नेणे म्हटले की सध्या मोरूच्या अंगावर शहारे येतात. हा कायदा येण्याच्या आधी मोरूच्या बायकोने छान कपाळावर गंध लावा, गांधीटोपी घाला व नंतरच गायीला बाजारात न्या, मग कुणी संशय घेणार नाही असा सल्ला दिला होता. मोरूला तो पटला नाही, पण आता कायद्याने तोही मोडीत निघाला आहे. सध्याच्या विषाक्त वातावरणामुळे मोरू गायीला चरायला सुद्धा बाहेर पाठवत नाही. उगीच नसते बालंट नको असा त्यामागचा त्याचा साळसूद विचार आहे. त्यामुळे त्याचा गायीवरचा खर्चही वाढला आहे. हे भाकड जनावर मेले तर कसे करायचे, हा मोरूसमोरचा सध्याचा गहन प्रश्न आहे. त्याचे उत्तर त्याला अजून सापडलेले नाही. ही काळजी बघून मोरूच्या मुलाने आता भविष्यात गाय पाळायची नाही असे निर्वाणीच्या सुरात सांगितले आहे. एक परंपरा खंडित होणार याचे मोरूला दु:ख वाटत असले तरी त्याचा नाईलाज झाला आहे. सकाळी उठून मोरू गायीकडे बघतो तेव्हा या मुक्या जनावराची त्याला दया येते व ही दयाबुद्धी राजकारणी कधी दाखवतील, असा प्रश्न त्याला अस्वस्थ करत नेतो.

devendra.gawande@expressindia.com