करोनातून बरा होऊन रुग्णालयातून बाहेर पडलेल्या एकाने आपल्याला करोना झालाच नव्हता, प्रशासनाने आपल्याला जाणीवपूर्वक रुग्णालयात ठेवले होते, असा दावा फेसबूक लाईव्हद्वारे करणाऱ्या रुग्णाला पुन्हा प्रशासनाने ताब्यात घेतले व १४ दिवसांकरिता विलगीकरणात ठेवले. शिवाय घरी पोहोचल्यानंतर स्वत:चा सत्कार करवून घेतल्याप्रकरणी व शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हाही त्याच्याविरुद्ध दाखल केला.
जमीरऊल जफीरऊल मोहम्मद (३४) रा. तकिया दिवानशाह, मोमीनपुरा असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मुस्लीम टोपी विकण्याचा व्यवसाय करतो. १३ मार्चला तो टोपी खरेदीसाठी दिल्लीला गेला होता. १५ मार्चला तो नागपुरात परतला. दरम्यान त्याच्या प्रवासाची माहिती समजतात प्रशासनाने त्याला ताब्यात घेऊन विलगीकरण केंद्रात ठेवले. त्याचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.
त्या ठिकाणी उपचार केल्यानंतर तो बरा झाला. त्यामुळे शुक्रवार १७ एप्रिलला त्याची सुटी झाली. तो घरी गेला असता त्याने स्वत:चा सत्कार करवून घेतला. यावेळी त्याने फेसबूक लाईव्ह करून आपल्याला काहीच झाले नव्हते, जाणीवपूर्वक मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते, अशी अफवा पसरवत होता.
शिवाय बरा होऊन रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर त्याला घरातच विलगीकरणात राहण्याचे आदेश दिले असताही तो लोकांमध्ये मिसळला व स्वत:चा सत्कार करवून घेतल्याने महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील यांच्या तक्रारीवर तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी भादंविचे कलम १८८, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोप प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला पुन्हा आमदार निवासातील विलगीकरणात ठेवले. आरोपी सध्या बरा झाला असून त्याच्या परिसरातील ८ लोकांचे नमुनेही नकारात्मक आले आहेत.
मेडिकलमध्येही असाच उपद्व्याप
आरोपीला करोनाचे निदान झाल्यानंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मेडिकलमध्ये सुविधांचा अभाव असल्याची माहिती देण्यासाठी त्याने रुग्णालयातून फेसबूक लाईव्ह केले होते. त्यावेळी प्रशासनाने त्याला तंबी दिली होती. त्यानंतरही त्याची मुजोरी कायम होती.