नागपूर : कुख्यात गुन्हेगाराचा मित्रानेच दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना शनिवारी पहाटे पाच वाजता कळमन्यात उघडकीस आली. चंदनसिंह प्रमोद बंशकार (२६, सूर्यनगर) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे तर संतोष ऊर्फ भाचा जितलाल पटीला (२०, मिनीमातानगर) असे आरोपीचे नाव आहे.
कळमन्यात राहणारा चंदनसिंह बंशकार याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी भाचा पटीला हासुद्धा गुन्हेगार आहे. दोघेही ‘वॉंटेड’ आहेत. चंदनसिंहचे वडील अर्जुनदास कुकरेजा शाळेत नोकरीवर आहेत. चंदनसिंहच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच त्याने जबलपूरच्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला पळवून नागपुरात आणले. त्यामुळे चिडलेल्या वडिलाने त्याला घरातून हाकलून दिले. तो प्रेयसीसोबत भाड्याने खोली करून राहत होता. त्याला चोरी-घरफोडी करण्याची सवय होती. तसेच त्याला दारुचे व्यसन होते. त्याची भाचा पटीला या गुन्हेगारासोबत मैत्री होती. दोघेही नेहमी सोबत दारु पीत होते. शुक्रवारी सायंकाळी चंदन आणि भाचा यांच्या वाद झाला आणि हाणामारी झाली. त्यामुळे चंदन किरकोळ जखमी झाला आणि पळून गेला. मात्र, भाचाने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. चंदन हा घरी गेला. त्यावेळी त्याचे वडील घरी होते. चंदनच्या डोक्याला जखम बघून वडिलांनी विचारणा केली. ‘भाचा पटीलाने मारहाण केली. त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मी लपून बसलो’ असे सांगितले. वडिलांना १०० रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे दिले परंतु आज रात्रभर घरी थांब, असे सूचवले. मात्र, त्याने वडिलाचे न ऐकता तो घरातून निघून गेला.
चंदन हा कुकरेजा शाळेच्या मागे लपून बसल्याची माहिती आरोपी भाचा पटीला याला मिळाली. त्याने पहाटे पाच वाजता चंदनला पकडले. काचेच्या बाटलीने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर दगडाने ठेचून खून केला. सकाळी एका खबऱ्याने सहायक पोलीस निरीक्षक ताणाजी गव्हाने यांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब घटनास्थळ गाठले. गंभीर जखमी चंदनला मेयोत दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून भाचा पटीला याला दोन तासांत अटक केली.