सायबर गुन्हेगारांनी आता वीज बिल भरणा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईल ॲपकडे मोर्चा वळविला आहे. बिल भरण्यासाठी ॲप डाऊनलोड करताच खात्यातील पैसे परस्पर काढून घेत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. नुकताच नागपुरातील उच्च शिक्षित असलेल्या एका अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगाराने सापळ्यात अडकवून तीन लाखांनी फसवणूक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महावितरण विभागाच्या नावावर सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याच्या घटना वाढत आहे. घरातील वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून मोबाईलवरून बील भरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. अशीच एक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. हिलटॉप, अंबाझरी येथे राहणारे विशाल गेंदलाल चौधरी (४१) हे मॉईलमध्ये नोकरीला आहेत. २४ जून रोजी त्यांच्या भावाच्या मोबाईलवर महावितरणकडून वीज बिल भरण्यासाठी एक मॅसेज आला होता. भावाने तो मॅसेज चौधरी यांना फॉरवर्ड केला. चौधरी यांनी बील भरण्यासाठी महावितरणचे ॲप डाऊनलोड केले. तोच एका सायबर गुन्हेगाराने त्यांना फोन करून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती आणि ओटीपी क्रमांक घेतला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून ३ लाख रुपये वळते झाल्याचा मॅसेज त्यांना आला. मॅसेज पाहून चौधरी यांच्या पायाखालची वाळू सरकली. लगेच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

असे ओढतात जाळ्यात

सायबर गुन्हेगार हे अनेकांच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून वीज बिलाची थकबाकी असून घरातील वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे सांगतात. त्यामुळे अनेक जण वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करतात. त्याॲप मधून ग्राहकांची संपूर्ण माहिती आणि बँकेची माहिती घेऊन खाते रिकामे केले जाते.

अशी टाळा फसवणूक
वीजबिलासाठी नियमित येणाऱ्या मॅसेजपेक्षा सायबर गुन्हेगारांनी पाठविलेले मॅसेज वेगळे असतात. तो फरक लक्षात घ्यावा. बील भरण्यासाठी एपीके फॉरमॅटमधील कोणतेही ॲप डाऊनलोड करू नये. आपल्या बँक खात्याची माहिती आणि एटीएमचा पासवर्ड फोनवरून देऊ नये. नवीन ॲप वरून बील न भरता आपल्या बँकेने सुविधा पुरविलेल्या ॲपमधून भरल्यास फसवणूक होत नाही.