नागपूर : मेडिकलच्या बालरोग विभागाने फुफ्फुसाच्या प्रतिकारशक्ती संबंधित सिस्टीक फायब्रोसिस या आजाराचे निदान करण्यासाठी एम्स दिल्लीला मदत मागितली. त्यावर एम्सने मदतीचे आश्वासन देत एका डॉक्टरला प्रशिक्षण देत एक यंत्र उपलब्ध करण्याची तयारीही दर्शवली. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास मुलांच्या घामातून या दुर्मिळ आजाराचे निदान मेडिकलला होणे शक्य होणार आहे.

पश्चिमात्य देशातच ‘सिस्टीक फायब्रोसिस’ हा दुर्मिळ आजार आढळत असल्याचा गैरसमज आहे. परंतु, भारतातही या आजाराचे रुग्ण दिसतात. अडीच ते तीन हजार मुलांमधून एका मुलाला हा आजार होतो. परंतु, वेळेत निदान व उपचार मिळत नसल्याने रुग्णाचा जीव धोक्यात येतो. या आजाराचे निदान करण्यासाठी ‘जेनेटिक मॅपिंग’ ही तपासणी आवश्यक असून त्याला २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च येतो.

हेही वाचा – नागपूर : गँगस्टर तिरूपती भोगेला अटक

शासकीय रुग्णालयात प्रत्येक रुग्णाची ही महागडी तपासणी शक्य नसते. यामुळे या आजाराच्या संशयित मुलांची घामाची तपासणी करून सिस्टीक फायब्रोसिस आहे किंवा नाही याचे प्राथमिक निदान करणारी तपासणी गरजेची आहे. मेडिकलला ही तपासणी उपलब्ध करण्यासाठी बालरोग विभागाने दिल्ली एम्सला विनंती करत प्रस्ताव दिला. एम्सने आश्वासन देत एका डॉक्टरला प्रशिक्षण देण्यासह एक यंत्रही तपासणीसाठी उपलब्ध करण्याचे संकेत दिले. त्यामुळे मेडिकलने एका डॉक्टरला तेथे पाठवण्याची तयारी केली आहे. त्यानंतर संबंधित यंत्र उपलब्ध झाल्यास ही तपासणी नागपुरातील मेडिकलला उपलब्ध होईल. त्यामुळे ही तपासणी करणारे नागपूरचे मेडिकल हे राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असेल.

हेही वाचा – नागपूर : कुख्यात सुमीत ठाकूरविरुद्ध पोलिसांनी कसली कंबर, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एम्स, दिल्लीने मदत देऊ केल्याने तेथे लवकरच डॉक्टर पाठवण्यासह तपासणीला आवश्यक यंत्र मिळून येथे तपासणी उपलब्ध होण्याचे संकेत मेडिकलच्या बालरोग विभागाने दिले.