अकोला : ‘एनसीबी’चा (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) अधिकारी असल्याची बतावणी करून व्यावसायिकांना लुटणाऱ्या चारजणांच्या टोळीला दहिहंडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. नदीम शाह दिवाण, असे तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्या तीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. उच्चशिक्षित नदीमचे 'आयपीएस' होण्याचे स्वप्न होते, मात्र ते अपूर्ण राहिल्याने तो गुन्हेगारीकडे वळून तोतया अधिकारी झाला. नागपूर शाखा ‘एनसीबी’चा अधिकारी असल्याचे सांगत नदीम शाह दिवाण याने काल अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार परिसरात पान टपऱ्यांवर कारवाई केली. मागील एक महिन्यापासून दहिहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे एनसीबीचे तोतया अधिकारी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चोहट्टा बाजार परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. ते तोतया अधिकारी आढळून आले. त्यांच्याकडे एक चारचाकी वाहन, त्यावर पिवळ्या रंगाचा दिवा लावलेला होता. तसेच या वाहनावर भारत सरकार असल्याचे स्टिकर लावले होते. हेही वाचा - वाशीम : रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण; विद्युत खांब मात्र तसेच उभे हेही वाचा - ‘या’ भाजपा आमदाराला दोन वर्षे शिक्षा होऊनही सदस्यता रद्द झाली नव्हती सध्या पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याची माहिती मुंबईच्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांना देताच त्यांनीही दहिहंडा पोलीस ठाण्यात भेट दिली. पुढील तपास सुरू आहे. नदीम हा ‘एमटेक’ अभियंता असून त्याचे ‘आयपीएस’ अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही आणि त्यानंतर गुन्हेगारीकडे वळाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.