लोकसत्ता टीम

अमरावती: मेळघाटातील धारणी तालुक्‍यात शुक्रवारी दुपारनंतर झालेल्‍या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून धारणी शहरात अनेक ठिकाणी झाडे पडली, तर काही झाडांच्या फांद्या तुटून विद्युत तारांवर पडल्या. यामुळे बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत असताना अचानक दुपारी काळे ढग दाटून आले आणि धो-धो पाऊस कोसळला. सोबतच सोसाट्याचा वारा देखील सुटला. अनेक भागात वादळाने झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब तुटून पडले. तीस मिनिटेच आलेल्या वादळाने कहर केला. अनेक ठिकाणचा संपर्क तुटला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक घरांची छपरे उडाली. पडझड देखील झाली. झाडे विद्युत तारांवर पडल्याने तारा तुटल्या. त्यामुळे दुपारपासून वीजपुरवठा बंद झाला. याबाबत माहिती मिळताच वीज वितरण कंपनीच्या वतीने तातडीने तारांवर पडलेली झाडे हटवून वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले. पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी मदत कार्यासाठी पुढे सरसावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार राजकुमार पटेल यांनी नुकसान झालेल्‍या भागाची पाहणी केली. धारणी तालुक्‍यातील खाऱ्या, टेंभ्रू, कुसूमकोट या गावांमध्‍येही वादळी पावसाने हानी झाल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. या पावसामुळे गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती शहरासह जिल्‍ह्यात ठिकठिकाणी सकाळपासून ढगाळी वातावरण होते.