अवकाळी पावसामुळे ‘डास’चा फटका, साठ ते सत्तर हजार रुपयांचा तोटा
अवकाळी पावसाने शेतपिकांना मातीमोल केले असून संत्र्याला मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. उपराजधानीची ओळख असणाऱ्या संत्र्यावर ‘डास’ रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे ही संत्री उकळल्यासारखी होत आहेत. कळमना बाजारात दररोज येणाऱ्या ५०० टन संत्र्यांपैकी १०० टन संत्री फेकण्यात येत आहेत. यामुळे साठ ते सत्तर हजार रुपयांचा तोटा होत आहे.
कळमना बाजारात कळमेश्वर, कोंढाळी, उमरेड, रामटेक तसेच यवतमाळ आणि जिल्यातील गावातून संत्री विक्रीसाठी आणली जातात. संत्र्याचे दररोज २०० टेम्पो येतात. यात सुमारे ४०० ते ५०० टन माल असतो. यावर्षी संत्र्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले तरी त्याचा फायदा काहीच नाही. पाऊस आवश्यकतेच्यावेळी आला नाही. आता अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. यामुळे दहा टनामागे दोन ते अडीच टन माल खराब होत आहे. ‘डास’ या रोगाने संत्र्यावर आक्रमण केले असून ही संत्री अक्षरश: उकळल्यासारखी होत आहेत. अशी संत्री विकल्या जात आहे, पण शेतकऱ्यांसह दलाल आणि विक्रेता, ग्राहक यांनाही नुकसान होत आहे. कळमना बाजारातून वेगवेगळ्या ठिकाणी संत्री जातात. अशावेळी २० रुपये किलोप्रमाणे संत्र्याचा अंदाजे भाव गृहीत धरला तरी हमालीचा चार ते सहा रुपये वेगळा खर्च आहे. माल ज्याठिकाणी उतरवला जातो, तेव्हा तो उतरवतपर्यंत दहा टनापैकी दोन ते अडीच टन माल फेकावा लागतो. अशावेळी हा खर्च कोण देणार आहे. किमान ६० ते ७० हजार रुपयांचा माल दररोज फेकावा लागतो आहे, असे कळमना बाजारातील संत्रा व्यापारी नज्जू करीम यांनी सांगितले. विदर्भातील शेतकऱ्यांना अंबिया बहारच्या संत्र्यात मोठे नुकसान झाले आहे. त्यात ‘डास’ नावाच्या रोगाने आक्रमण केल्यामुळे त्याचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.