अमरावती : क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादात धाकट्याने २३ वर्षीय थोरल्या भावाला मारहाण करुन भिंतीच्या दिशेने ढकलले. यामध्ये थोरल्या भावाचा मृत्यू झाला. दरम्यान सुरूवातीला या प्रकरणात आत्महत्येचा बनाव करण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालावरून त्याचे बिंग फुटले. ही घटना शुक्रवारी तळेगाव दशासर ठाण्याच्या हद्दीतील देवगाव येथे घडली. या प्रकरणी आज मृत युवकाच्या २० वर्षीय धाकट्या भावाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश भास्कर राऊत (२३, रा. देवगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपी चेतन भास्कर राऊत (२०, रा. देवगाव) याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी रात्री चेतनने दोन बकऱ्या कुठे नेल्या, अशी विचारणा थोरला भाऊ गणेश याला केली. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात चेतनने थोरला भाऊ गणेशसोबत झटापट करून त्याला भिंतीवर ढकलले. त्यात डोक्याला जबर मार लागून गणेशचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा >>> नागपूर : पत्नीने शारीरिक संबंधास नकार दिला, चिडलेल्या पतीने…
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ मार्चला चेतनने भाऊ गणेश याने गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार तळेगाव दशासर ठाण्यात नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. शवविच्छेदन अहवालावरून डोक्याला जबर दुखापत झाल्याने गणेश यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. तपासात धाकटा भाऊ चेतननेच गणेश यांची हत्या केल्याचे समोर आल्यावर त्याला अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.