खासदार बाळू धानोरकरांनी आपल्याच मंत्र्यांना सुनावले; विधान परिषदेत विदर्भातून दोन आमदार देण्याची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : विदर्भाने काँग्रेसला १६ आमदार दिले म्हणूनच महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्हाला मंत्रिपदे मिळाली. हे स्मरणात ठेवून विधान परिषदेवर विदर्भातील किमान दोघांना संधी द्यावी, अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव लोकसभा सदस्य सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी उद्धव ठाकरे सरकारमधील आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले. जाहीर कार्यक्रमात धानोरकर यांनी पक्षातील वरिष्ठांना सुनावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.

यवतमाळ येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते. राज्यपाल कोटय़ातून विधान परिषदेवर १२ आमदार नेमण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष प्रत्येकी चार आमदार देणार आहेत. धानोरकर यांनी काँग्रेसच्या वाटय़ातील चारपैकी दोन जागा विदर्भाला मिळाल्या पाहिजे, अशी आग्रही भूमिका जाहीर कार्यक्रमात मांडली.

त्यासाठी त्यांनी व्यासपीठावर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाच थेट सुनावले. धानोरकर व्यासपीठावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याकडे बघत म्हणाले, आमच्या विदर्भाला विसरू नका. विदर्भाने तुम्हाला १६ आमदार दिले आणि एक खासदार दिला. आता विदर्भाला विधान परिषदेत झुकते माप मिळाले पाहिजे.

आमचे १६ आमदार निवडून आले नसते तर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नसते हे सुद्धा लक्षात ठेवा. तेव्हा विदर्भातील दोन तरी लोकांना  विधान परिषदेत पाठवा, असेही ते म्हणाले.  सार्वजनिक कार्यक्रमात अशाप्रकारे विधान परिषदेच्या जागांसाठी मागणी धानोरकर यांनी केल्याने व्यासपीठावरील नेते मंडळी अवाक् झाली.

यासंदर्भात लोकसत्ताशी बोलताना धानोरकर यांनी आपल्या भूमिके वर ठाम असल्याचे स्पष्ट के ले. भाषणाच्या प्रारंभी धानोरकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली.

भाजपने बिहार विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात लस देण्याचे आश्वासन दिले. त्यावरून धानोरकर यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकणार होते. दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देणार होते. ते देता आले नाही आणि आता बिहारमध्ये लस द्यायला निघाले आहेत.

बिहारमधील जनतेला लस देता तर महाराष्ट्रातील, देशातील जनता काय जनावर आहे काय, असा सवालही त्यांनी केला. तसेच केंद्रातील सरकारने दिलेले एकही आश्वासन  त्यांना पूर्ण करता आले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for two mlc from vidarbha in the legislative council zws
First published on: 03-11-2020 at 00:37 IST