नागपूर : एका प्राणिसंग्रहालयाने त्याच्या प्राणिसंग्रहालयातील मांसभक्षी प्राण्यांसाठी निरोगी पण नको असलेले पाळीव प्राणी दान करण्याचे आवाहन केले आहे. प्राणिसंग्रहालयाच्या या अनोख्या आवाहनाने जगभरातच चर्चा सुरू झाली आहे. एवढंच नव्हे तर या प्राण्यांना त्यांच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून शांतपणे कोणताही त्रास न देता मारलं जाईल, असे देखील या प्राणिसंग्रहालयाने म्हंटले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आजतागायत कोणत्याही प्राणिसंग्रहालयाने असे आवाहन केले नाही. त्यामुळे डेन्मार्कमधील प्राणिसंग्रहालयाने केलेल्या या आवाहनाची चांगलीच चर्चा आहे. या प्राणिसंग्रहालयाने त्यांच्या प्राणिसंग्रहालयातील मांसभक्षी प्राण्यांसाठी चक्क पाळीव प्राण्यांची मागणी केली आहे. प्राणिसंग्रहालयाच्या आवाहनामुळे प्रत्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘तुम्हाला नको असलेले पाळीव प्राणी आमच्या शिकारी प्राण्यांसाठी’ असे म्हणत लोकांना निरोगी पण नको असलेले पाळीव प्राणी शिकारी प्राण्यांच्या खाद्यापोटी दान करण्याचे आवाहन या प्राणिसंग्रहालयाने केले आहे. त्यांनी आपले निरोगी पण नको असलेले पाळीव प्राणी प्राणिसंग्रहालयाला दान करावेत, जेणेकरून ते शिकारी प्राण्यांना खायला देता येतील, असे या आवाहनात म्हटले आहे.

ऑल्बोर्ग प्राणिसंग्रहालयाने लोकांना जिवंत कोंबड्या, ससे आणि गिनी पिग्ज दान करण्याचे आवाहन केले आहे. जिवंत घोड्यांची देखील त्यांनी मागणी केली आहे आणि एवढेच नाही तर असे घोडे देणाऱ्या मालकांना टॅक्समधून सवलत देखील मिळू शकते. इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावरून त्यांनी हे आवाहन केले आहे. प्राण्यांची नैसर्गिक अन्नसाखळी कायम राखणे ही आमची जबाबदारी आहे आणि छोटे प्राणी हे आमच्या शिकारी प्राण्यांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. जंगलात ज्याप्रमाणे मांसाहारी प्राणी नैसर्गिकरित्या शिकार करून अन्न मिळवतात, तसाच हा प्रकार आहे आणि युरेशियन लिंक्ससाठी तर हे अगदी योग्य आहे.

डेन्मार्कमधील ऑलबोर्ग प्राणिसंग्रहालयात सिंह आणि वाघांसारखे इतर शिकारी प्राणीही आहेत. वीक डेज म्हणजेच सोमवार ते शुक्रवार हे प्राणी दान करता येतील आणि अपॉइंटमेंटशिवाय एकावेळी चारपेक्षा जास्त प्राणी देता येणार नाहीत. त्यांच्या संकेतस्थळावर, मांस खात असलेल्या वाघाच्या फोटोखाली, ऑल्बोर्ग प्राणिसंग्रहालयाने घोडे दान करण्याच्या अटी दिलेल्या आहेत. या प्राण्यांना त्यांच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून शांतपणे कोणताही त्रास न देता मारलं जाईल, असं या प्राणिसंग्रहालयानं म्हटलं आहे.