गडचिरोली : पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक भागातील रस्ते वाहून गेले. राष्ट्रीय महामार्गाची कामे अपूर्ण आहेत. सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या समस्या सोडविण्यासाठी वेळ नाही. केवळ उद्योग आणि उद्योजकांसाठी ते उपलब्ध असतात. मग गडचिरोलीतील जनतेने जावे तरी कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसने जिल्ह्यातील असुविधेबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणारे किमान प्रश्न तरी सुटतील अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात होती. फडणवीस यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून गडचिरोली शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा असल्याचे सांगितले. जिल्ह्यात प्रस्तावित आणि सुरु असलेले लोहखनिज प्रकल्प म्हणजे गडचिरोलीचा विकास असे चित्र रंगाविण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. फडणवीस यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न कायम आहे. कित्येकदा आढावा बैठकीत हा प्रश्न येतो त्यावर ते अधिकाऱ्यांना खडसावतात पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. दक्षिण गडचिरोलीला जोडणारा आष्टी- आलापल्ली- सिरोंचा आणि आलापल्ली- भामरागड महामार्ग पहिल्याच पावसात ठप्प झाला. मागील चार वर्षापासून या महामार्गांची कामे सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका गर्भावती महिलेला जेसीबीत बसून नाला ओलांडावा लागला. यावर राज्यभर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी एका चार वर्षाच्या चिमुकल्याला रुग्णवाहिकेअभावी जीव गमवावा लागला. सामान्य नागरिक या मार्गाने प्रवास करू शकत नाही. जी कामे झाली त्यांचा सुमार दर्जा प्रत्येक पावसात उघडा पडतो. सिरोंचा महामार्ग तर दरवेळेस बंद होतो. या मार्गांवर अपघातात शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला. पण मार्ग पूर्ण झाला नाही. यावर पालकमंत्री कधीच बोलत नाहीत. त्यांना केवळ उद्योग आणि लोहखनिज दिसतात. सामान्य जनतेचे होणारे हाल दिसत नाही. अशी टीका काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.

हेही वाचा : Bhandara updates: वीज कोसळून महिला मजूर ठार, शेतात रोवणी करताना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकृष्ट बांधकाम, रस्ते आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर

दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर भागात अनेक रस्ते वाहून गेले आहे. भामरागड तालुक्यात तर रस्त्याचे बांधकाम काही महिन्यातच उखडताना दिसून येतात. जारावंडी ते पुढे छत्तीसगड जाणाऱ्या मार्गांवर मोठे भागदाड पडले आहे. आलापल्ली ते सिरोंचा हा महामार्ग आहे की गावातील रस्ता हेच कळायला मार्ग नाही. भामरागड महामार्गाचे बांधकाम त्याहूनही निकृष्ट आहे. अधिकारी यावर बोलण्यासाठी तयार नाही. नव्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील यासाठी वेळ नाही. आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा विदारक पारिस्थितीतही पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.