चंद्रपूर : स्थानिक पातळीवर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध झाल्यानंतरही भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष, खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भासरे तसेच दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे ज्येष्ठ बंधू अनिल धानोरकर यांनी आज, गुरुवारी, मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार करण देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. धानोरकर यांच्या प्रवेशामुळे धानोरकर कुटूंबातील उभी विधानसभा निवडणुकीनंतर पून्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्युनंतर लोकसभा निवडणुकीत धानोरकर कुटूंब एकत्र होते. मात्र विधानसभा निवडणुकीत धानोरकर कुटुंबात उभी फुट पडली. अनिल धानोरकर यांनी कॉग्रेस पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र खासदार धानोरकर यांच्या बंधू प्रेमामुळे अखेरच्या क्षणी कॉग्रेसने प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिली. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि कॉग्रेसचे काकडे प्रचंड मताधिक्क्याने पराभूत झाले. विशेष म्हणजे तेव्हाच या सर्व घडामोडीमुळे तीव्र नाराज झालेल्या अनिल धानोरकर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. ते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरले होते.
मात्र, धानोरकर आणि काकडे दोघांचाही या निवडणुकीत टिकाव लागला नाही. एकाला २५ हजार तर दुसऱ्याला केवळ १५ हजार मतांपर्यं मजल मारता आली. तेव्हापासून धानोरकर कुटुंबात अंतर्गत कलह सुरू झाला. दरम्यान राजकीय पुनर्वसनाची संधी शोधत अखेर अनिल धानोरकर यांनी भाजपाचा पर्याय निवडला. अनिल धानोरकर यांच्यासह त्यांच्या पत्नी वंदना धानोरकर, माजी नगरसेविका शारदा ठवसे, लीला ढुमणे, निमकर, राजूरकर, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, संदीप कुमरे आदींनीही भाजपात प्रवेश घेतला.
विशेष म्हणजे धानोरकर यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक पातळीवर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तीव्र विरोध केला होता. या विरोधानंतरही धानोरकर यांनी अहीर यांचा हात पकडून भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भद्रावती नगर परिषद तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपला फायदा होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे धानोरकर यांच्या भाजप प्रवेशाने एकाच वेळी कॉग्रेस, उध्दव ठाकरे तथा वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांना निवडणुकीत फटका बसणार असेही बोलले जात आहे. अनिल धानोरकर शरीराने शिवसेना उध्दव ठाकरे पक्षात असले तरी मागील अनेक वर्षापासून कॉग्रेसचेच काम करित होते. आता त्यांनी भाजपची संगत केली आहे. ही संगतही किती दिवस राहणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.