विधानसभा निवडणुकीबाबत गडकरींचा विश्वास; कार्यकर्त्यांचा विजयी संकल्प मेळावा

विधानसभा निवडणुकीत विदर्भात पूर्ण जागा जिंकायच्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला निभ्रेळ यश मिळून पुन्हा राज्यात सरकार येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्यावतीने बुधवारी कवी सुरेश भट सभागृहात आयोजित पूर्व विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा, राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, माजी खासदार अजय संचेती, दत्ता मेघे, रणजीत पाटील, कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती  यांच्यासह आमदार, खासदार, महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, भाजप – शिवसेना युती होईल याचा मला विश्वास आहे. विजय मिळाल्यानंतर काही जणांना अहंकाराचा वारा लागतो. पण, विजय हा कार्यकर्त्यांमुळेच मिळतो, हे कायम लक्षात ठेवा, तिकीट कुणाला मिळणार याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. पण, भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट वाटपासाठी कोणताही कोटा नाही. कामाचे मूल्यमापन करूनच तिकीट दिले जाईल. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळाले नाही त्यांनी माझ्यात काय कमी आहे, असे भावनिक प्रश्न विचारू नये. अनेक जण गेल्या वेळेस अखेरच तिकीट  द्या म्हणून माझ्याकडे आले होते. आता तेच लोक पुन्हा मुलासाठी,पत्नीसाठी तिकीट मागता. हे योग्य नाही, असेही गडकरींनी बजावले.

जगतप्रसाद नड्डा म्हणाले, कलम ३७०च्या माध्यमातून काश्मीरला भारतापासून तोडण्याचे षडयंत्र होते. काँग्रेस नेते देखील त्यात सहभागी होते. भाजपची सदस्य संख्या ५४ दिवसात १७ कोटींवर पोहोचली आहे. जगातील १९३ देशांपैकी ७ देश वगळता कोणत्याच देशाची इतकी लोकसंख्याही देखील नसल्याचे नड्डा यांनी गौरवाने अधोरेखित केले. यावेळी सरोज पांडे यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी व स्मृती मंदिर परिसरात भेट देऊन दर्शन घेतले. संचालन अनिल सोले यांनी केले.

आरक्षण हवेच – गडकरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामाजिक, आर्थिक आणि  शैक्षणिकदृष्टय़ा मागास समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, अशीच माझी भूमिका आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. सोमवारी माळी समाजाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांच्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला होता. बुधवारी त्यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. आरक्षण हवेच पण त्याचा लाभ समाजातील शोषित, पीडित, दलित, सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्यांना व्हावा, असे ते म्हणाले.