क्रिकेटपटू प्रशांत वैद्य यांचे मत

मधुमेहग्रस्ताने नित्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार, व्यायाम व आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास खेळाडूंना त्याचा त्रास होत नाही. तो त्याच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतो व सामान्य जीवन जगू शकतो, असे मत प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रशांत वैद्य यांनी व्यक्त केले. डायबेटिज केयर फाऊंडेशन ऑफ इंडिया (नागपूर)च्या वतीने रविवारी आयोजित मधुमेहाची पाठशाळा या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध भागासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेशासह इतर राज्यातील ‘टाईप १’ चे रुग्ण व त्यांचे पालक उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर, समाजसेवक गिरीश गांधी, सुप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते. प्रशांत वैद्य पुढे म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळताना एका खेळाडूला टाईप १ मधुमेह असल्याचे पुढे आले. याप्रसंगी निवडसमितीच्या डोक्यात आजारपणामुळे त्याला घ्यावे की नाही, हा विचार घोळत होता. त्यावेळी इतर खेळाडूंनी त्या खेळाडूला समर्थन दिले. आजार नव्हे तर खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला महत्त्व देण्याचा सल्ला निवड समितीला देण्यात आला. योग्य काळजी घेतल्यावर मधुमेहग्रस्तही चांगले आयुष्य जगू शकत असल्याचे तो म्हणाला. विजय फणशीकर म्हणाले की, सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे हे विविध व्यवसाय करून आरामात आपले आयुष्य जगू शकत होते, परंतु त्यांनी आपले जीवन कुष्ठरुग्णांच्या सेवेला समर्पित करून समाजाला सेवाधर्माचा आदर्श घालून दिला. ही शिकवण सर्वानी अंगिकारण्याची गरज आहे. गिरीश गांधी म्हणाले की, मधुमेहाच्या रुग्णांना आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता यावे म्हणून शिकण्याची इच्छा असल्याचे या कार्यक्रमातील उपस्थितीने दाखवले आहे. हे उपक्रम सर्वत्र राबवण्याची गरज आहे. कार्यक्रमाला डॉ. सरिता उगेमुगे, डॉ. सचिन गाथे, कविता गुप्ता यांच्यासह बरेच मान्यवर उपस्थित होते.

मातीच्या भांडय़ात इन्सुलिन ठेवणे शक्य

मध्य भारतात उकाडा जास्त असून काही भागात भारनियमनामुळे वीजपुरवठाही खंडित असतो. तेव्हा या भागात टाईप १ च्या मधुमेहग्रस्तांना इन्सुलिन ठेवायचे कुठे हा प्रश्न उद्भवतो. यावर डॉ. सुनील गुप्ता यांनी तोडगा सांगितला. वाळूमध्ये मातीचे भांडे ठेवून त्यात विशिष्ट भांडय़ात इन्सुलिन ठेवता येते, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचा मध्य भारतातील गरीब रुग्णांना निश्चित लाभ होणार आहे. मधुमेहामुळे डोळे, किडनी, रक्तवाहिन्यांसह शरीराच्या विविध अवयवांना धोका असून योग्य काळजीने हे धोके टाळणे शक्य असल्याचे डॉ. गुप्ता म्हणाले.