मातृहृदयी ते रणरागिनी नायिकेला प्रेक्षकांची दाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्तातर्फे आयोजित ‘लोकांकिका’ या एकांकिका स्पध्रेत सादर झालेल्या नाटकांमध्ये कलांवतांनी स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडले. हे स्त्री जीवन काहीवेळा ते विनोदी अंगाने जाणारे, कधी संशयाचे दाट धुके निर्माण करणारे, कधी मायेच्या पदराने एकमेकींना सावरणारे तर कधी रणरागिनी होऊन थेट परिस्थितीला भिडणारे होते.

‘अथांग’मधील सासू-सुनेचे संबंध, गटारमधील गटार साफ करणारी महिला व पीएच.डी. करणाऱ्या तरुणीचा संवाद, ‘रूबरू’मधील दोन मैत्रिणीतील लैंगिक संबंध आणि ‘भाजी वांग्याची’मधील दोन राजकारण्यांच्या बायकांमधील विनोदी संवाद प्रेक्षकांना खूप भावले. एकूण नऊ एकांकिका सादर झाल्या. त्यापैकी काही एकांकिकांमधील स्त्री जीवन कायम लक्षात राहण्याजोगे होते.  केवळ पुरुषांचे नाटक सांगायचे झाले तर ‘पंचमवेध’चा उल्लेख करता येईल किंवा निव्वळ महिलांचे नाटक म्हटले तर ‘इंक- इन्क्रिडेबल फेसऑफ’ ही एकांकिका.

अथांगमध्ये १० वर्षांच्या मुलाच्या हृदय प्रत्यारोपणासाठी शहरातील दवाखान्यांमध्ये फिरणाऱ्या, एकमेकींना भावनिक आधार देणाऱ्या, वेळप्रसंगी वाद घालणाऱ्या सासू सुना साकारण्यात आल्या. ‘इंक- इन्क्रिडेबल फेसऑफ’मध्ये परस्परांवर अविश्वास दाखवणाऱ्या, व्यसनी, कधी प्रेम दाखवणाऱ्या तर कधी कडाडून भांडणाऱ्या महिलांचे दर्शन घडले. सकस कथाबीज असलेली ‘गटार’अतिशय हृदयस्पर्शी आणि अनपेक्षित वास्तव मांडणारी एकांकिका ठरली.  ‘गटार’ साफ करणाऱ्याच्या   पत्नीची भूमिका वठवणारी महिला व त्यांचे प्रश्न जाणून घेणाऱ्या महिलांमधील संवाद अतिशय बोचरे आणि हृदयाला पिळ पाडणारे होते. कचरा साफ करून एका महिलेची साडी काहीशी खराब झालेली असते.

अशावेळी तिच्या हातचा चहा मुलाखतीसाठी येणारी मुलगी नाकारते. तेव्हा जराही स्वाभिमान बाजूला न सारता ‘गटार’मधील मुख्य नायिका खडे बोल सुनावते. ते संवाद प्रेक्षकांच्याही मनावर चांगलेच आदळतात.

‘भाजी वांग्याची’ ही राष्ट्रीय ज्युनियर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली एकांकिका राजकीय स्वरूपाची असल्याने त्यात गाव, खुशमस्करे, घोषणा, एकमेकांचा पाणउतारा

करणारे पात्र आणि त्यांच्या त्यांच्या नवऱ्याच्या बाजूने वाद घालणाऱ्या महिलाही दिसल्या!  त्यांच्यातील अनेक संवादांना प्रेक्षकांनी दिलखुलास दाद दिली.

प्रायोजक

‘सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘पितांबरी’ सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या या स्पर्धेचे टेलिकास्ट पार्टनर ‘झी मराठी’ आणि न्यूज पार्टनर ‘एबीपी माझा’ आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different aspects of female life unfolded in the loksatta lokankika
First published on: 08-12-2018 at 02:09 IST