बुलढाणा: राजकारणात खुर्चीसाठी नेते, पदाधिकारी यांच्यात जाहीर वाद, संघर्ष होणे सामान्य बाब ठरते. किंबहुना खुर्ची वरून नेत्यांत संगीत खुर्ची, मानापमान नाट्य रंगले नाही तर ते नवल ठरते. नेत्यांमध्ये खुर्चीसाठी भांडणे झाल्याच्या अनेक घटना चर्चेत आल्या आणि गाजल्या आहे. मात्र पदावरून चक्क अधिकाऱ्यात आणि तेही शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या पोलीस दलात दोन अधिकाऱ्यांमध्येच खुर्चीवरून वादंग निर्माण झाले, संगीत खुर्ची सारखा खेळ रंगत असेल तर काय म्हणावं? असा प्रश्न सध्या बुलढाण्यात अर्थात जिल्हा पोलीस दलात ऐरणीवर आला आले.
मागील २२ मे २०२५ पासून पोलीस दलात पोलीस अधीक्षक पदावरून कलगी तुरा रंगलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अख्त्यारितील गृह खात्यात हे नाट्य रंगल्याने जास्तच चर्चा होत आहे.आज गुरुवारी, ३० मे रोजी या कलगी तुऱ्याने संगीत खुर्ची आणि मानापमान नाट्यपर्यंत मजल मारलीय! पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सकाळपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत.गत आठवडाभरापूर्वी बदली होऊन त्या बदलीवर स्थगिती मिळवणारे एसपी विश्व पानसरे यांनी आज सकाळीच एसपी कार्यालयातील खुर्चीचा ताबा घेतला आहे.दुसरीकडे गेल्या आठवड्यात पदभार स्वीकारलेले एसपी निलेश तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी महामुनी यांच्या दालनात बसून होते. एस पी कार्यालयातील यंत्रणा, प्रशासन ते सामान्य पोलीस दादा संभ्रमात आहे. पोलीस अधीक्षक म्हणून एसपी कुणाचा आदेश मानायचा? कुणाच्या हुकूमची तालीम करायची? जिल्हा पोलीस दलाचे बॉस कोण? अशा विविध प्रश्नांची चर्चा सुरू आहे
गेल्या आठवड्यात विश्व पानसरे यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी निलेश तांबे यांची नियुक्ती झाली होती. तांबे यांनी नियुक्ती झाल्यानंतर त्याच दिवशी पदभार स्वीकारला होता. दुसरीकडे एसपी विश्व पानसरे देखील अन्याय झालाची भावना झाल्याने ‘कॅट’ मध्ये गेले होते. दुसऱ्याच दिवशी पानसरे यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती. पानसरे गेल्या आठवड्याभरापासूनच आजारी रजेवर आहे. इकडे निलेश तांबे एसपी म्हणून कारभार सांभाळत आहे.अशातच आज गुरुवारी सकाळीच अचानक विश्व पानसरे यांनी एसपी कार्यालयातील खुर्चीचा ताबा घेतला. ही बाब कळताच निलेश तांबे देखील एसपी कार्यालयात पोहोचले. तांबे यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या दालनातून कारभार सपाहण्यास पसंती दिल्याचे दिसून आले. तांबे यांनी पानसरे यांच्याकडे प्रभार दिलेला नाही.त्यामुळे सध्यातरी यंत्रणा तांबे यांच्याच हातात असल्याचे दिसत आहे. विश्व पानसरे सध्या एकटेच एसपी कार्यालयातील खुर्चीत गणवेशात बसले आहेत.जिल्हा पोलिस दलात सध्या खळबळ उडाली आहे..एसपी म्हणून ऐकायचे कुणाचे? हा मजेदार एकच प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे..