५२ पदांची गरज, मात्र १४ डॉक्टरच उपलब्ध होणार
नागपुरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सोमवारी झालेल्या वेगवेगळ्या विभागातील ५२ पदांच्या मुलाखतीकडे डॉक्टरांनी पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुलाखतीत प्राध्यापकांच्या तीन जागांकरिता एकही उमेदवार पुढे आला नसून २७ वरिष्ठ निवासी डॉक्टरांची गरज असतांना केवळ ५ पदे भरण्यात प्रशासनाला यश आले. सुपरच्या बऱ्याच महत्त्वाच्या विभागांना वरिष्ठ निवासी डॉक्टर मिळाले नसल्याने येथे रुग्णांसाठी दृष्टचक्र सुरूच राहणार, हे वास्तव आहे.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या अखत्यारित सुपरस्पेशालिटी रुग्णालय येते. शासनाने अनेक वर्षांपूर्वी सुपरची स्थापना मेंदूसह वेगवेगळ्या गंभीर गटातील गरीब रुग्णांना अत्याधुनिक तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी म्हणून करण्यात आली. सुपरस्पेशालीटीत सध्या मध्य भारतातील सर्वाधिक रुग्णांच्या हृदयाच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. सुपरमध्ये किडनी प्रत्यारोपणासह इतरही गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया होतात. सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. हा विषय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेतून एका सामाजिक कार्यकर्त्यांने मांडला. त्यानंतर न्यायालयाने शासनाला तातडीने येथील पदे भरण्याचे आदेशही दिले.परंतु त्यानंतरही शासनाकडून कारवाई होत नव्हती. त्यावरून याचिकाकर्त्यांने न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. तेव्हा शासनाला जाग आल्याने त्यांनी त्वरित येथील पदांना मंजुरी देत ती भरण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाला देण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार मेडिकलमधील ‘ट्रामा केयर सेंटर’सह सुपरस्पेशालिटीतील कंत्राटी पद्धतीने श्रेणी १ व २ च्या डॉक्टरांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या.
सुपरकरिता वेगवेगळ्या विभागातील ३ प्राध्यापक, ४ सहयोगी प्राध्यापक, १८ सहाय्यक प्राध्यापक, २७ वरिष्ठ निवासी डॉक्टरच्या पदाकरिता डॉक्टरांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु त्यात एकही उमेदवार प्राध्यापकाच्या पदाकरिता आला नाही.
सुपरला ४ सहयोगी प्राध्यापकांची गरज असतांना केवळ २ मिळाले. तर १८ सहाय्यक प्राध्यापकांची गरज असतांना केवळ ७ उमेदवारच मिळाले. वरिष्ठ निवासी डॉक्टरांबाबतचीही स्थिती वेगळी नाही. येथे २७ वरिष्ठ निवासी डॉक्टरांची गरज असतांना केवळ ५ उपलब्ध झाले. विशेष म्हणजे सुपरचा हृदयरोग विभाग, हृदयशल्यचिकित्सा विभाग, गॅस्ट्रोइंट्रॉलॉजी विभाग, मेंदूशल्य चिकित्सा विभागासह इतर काही विभागाला एकही वरिष्ठ निवासी डॉक्टर मिळाले नाही. तेव्हा शासकीय रुग्णालयात सेवा देण्याकरिता तरुण डॉक्टरांना रस नाही काय? हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांमध्ये ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात असल्याने त्याकरिता उमेदवार मिळत नसल्याचीही चर्चा रंगली आहे.

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात पहिल्या टप्यात वेगवेगळ्या पदांकरिता १४ नवीन डॉक्टर मुलाखतीतून उपलब्ध झाले आहे. निश्चितच त्याने येथे नवीन अभ्यासक्रमांसह रुग्णांना चांगल्या सेवा मिळणे शक्य होईल. इतर पदांकरिताही डॉक्टर मिळावे म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडेंसह सुपरचे प्रशासन प्रयत्न करेल.
– डॉ. मनीष श्रीगिरीवार
विशेष कार्य अधिकारी, सुपरस्पेशालिटी रुग्णालय, नागपूर</strong>