दररोज तीन विमानांना उशीर -वेळेचा अपव्यय

वेळेची बचत करण्यासाठी मध्यमवर्गीय विमान प्रवासाकडे वळले असतानाच वेळोवेळी विमानांचे वेळापत्रक कोलमडत असल्याने प्रवाशांच्या वेळेचे नियोजन बिघडले आहे. नागपूर विमानतळावर मागील महिनाभरात दरदिवशी तीन ते चार विमाने विलंबाने आली  किंवा उशिरा उडाली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विविध शहराकडे झेपावणारी आणि तिकडून नागपुरात उतरणारी सुमारे ३८ विमाने आगमन आणि प्रस्थानाचे वेळापत्रक पाळण्यात अपयशी ठरली आहे.  विमाने निर्धारित वेळेपेक्षा  २५ मिनिटे ते दोन तास उशिरा नागपुरात आली आणि येथून पुढील प्रवासासाठी निघाल्याची नोंद आहे. इंडिगो एअर लाईन्सचे नागपूर ते पुणे ‘६ई१३४’ हे विमान २ जूनला नागपुरातून एक तास दहा मिनिटे उशिरा निघाले. विशेष म्हणजे, या विमानाचा विलंबाचा सरासरी कालावधी एक तास दोन मिनिटे आहे.

बंगळुरू ते नागपूर ‘६ई३१२’ हे विमान रविवारी सकाळी ९.४५ वाजताच्या ऐवजी १०.११ वाजता आले. नागपूर ते दिल्ली ६ई१३४ हे विमान २५ मे रोजी ५३ मिनिटे विलंबाने आले होते. नागपूर ते कोलकाता इंडिगोचे ६ई४०३ हे विमान २१ मे रोजी दोन तास पाच मिनिटे उशिरा आले, तर ३० मे रोजी मुंबई ते नागपूर ६ई४०३ या विमानाचे आगमन दोन तास १५ मिनिटे विलंबाने झाले.

नागपूरहून उडणारे आणि विविध शहरातून नागपुरात येणारी विमाने गेल्या महिनभरात सातत्याने विलंबाने येत आहे आणि येथून विलंबाने उडत आहेत. वेळापत्रक बघितल्यास दररोज किमान तीन तरी विमाने २५ ते एक तास विलंबाने येत असल्याचे दिसून येते.त्यामुळे प्रवाशांना एक ते दीड तास अधिक खर्च  होतो.

दिल्ली आणि मुंबईला कार्यालयीन कामे करण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या नागपूरहून अधिक आहेत. सकाळचे विमान पकडून कार्यालयाच्या वेळेत काम ओटोपून परत येण्याचे नियोजन या विमानांच्या लेटलतिफीमुळे मोडित निघते.  यावर सध्यातरी  काही उपाय नाही. एकाच मार्गावर एकाहून अधिक एअर लाईन्स सेवा असल्यास प्रवाशांना पर्याय उपलब्ध होऊ शकतो, परंतु सध्या नागपूरहून एक तशी सोय नाही, असे नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक व्ही.एस. मुळेकर म्हणाले.

विलंबाची कारणे

देशांतर्गत विमानांची संख्या वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद विमानतळावर उतरण्यासाठी अनेक विमानांना प्रतीक्षा करावी लागते.  एका विमानाला विलंब झाल्यास त्या मागील सर्व विमानांना विलंब होतो. तांत्रिक बिघाड हा देखील महत्त्वाचा घटक आहे. तसेच खराब हवामानामुळे विमानांना उशीर होत असते. देशाअंतर्गत सेवा देणाऱ्या एअरलाईन्स एका विमानाचा उपयोग दिवसभरात वेगवेगळ्या शहरासाठी करीत असतो. त्यामुळे एका ठिकाणी विमान उशिरा निघाले की, त्याचे दिवसभराचे वेळापत्रक कोलमडते.

बंगळूरू, कोलकातामध्ये हवामानाचा फटका

भारतात वेगवेगळ्या शहरात हवामानाची वेगवेळी स्थिती असते. बंगळुरूला अचानक हवामान बदलते. वादळ येऊन पाऊस पडतो आणि दृश्यतामान कमी होते. कोलकाता येथे एप्रिल महिन्यात हवामानात मोठे बदल होतात. तेथे चक्रीवादळ येण्याची शक्यता अधिक असते. दिल्लीत हिवाळ्यात दाट धुके असते. त्यामुळे विमानांचे उडण्याचे आणि उतरण्याचे नियोजन फिस्कटते, असेही मुळेकर म्हणाले.

विमानांना विलंब होण्यास वाईट हवामान, तांत्रिक बिघाड आणि विमानतळावरील उपलब्ध धावपट्टी हे घटक महत्त्वाचे ठरतात. जगभर अशाप्रकारची समस्या आहे. एखाद्या मार्गावर एकाहून अधिक एअरलाईन्सची सेवा असल्यास, एखाद्या विमानाला विलंब झाल्यास दुसऱ्या विमानाने प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल.’’    – व्ही.एस. मुळेकर, वरिष्ठ संचालक, नागपूर विमानतळ