अमरावती : भारतीय संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी चैत्यभूमी (दादर, मुंबई) येथे येतात. पण, डॉ. बाबासाहेबांच्‍या काही अस्थी या अमरावती जिल्ह्यातील नया अकोला या गावात ठेवण्‍यात आल्‍या आहेत. या ठिकाणी असणाऱ्या या अस्थींच्या दर्शनासाठी हजारो अनुयायी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला दर्शनासाठी रांगा लावतात.

नया अकोला या छोट्याशा गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहेत, याचे अनेकांना आश्चर्य आहे. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्‍यामुळे या अस्‍थी गावात कशा आल्‍या, याबाबत अत्‍यंत रोचक असा प्रसंग सांगितला जातो. डॉ. बाबासाहेबांच्‍या निधनाची माहिती त्‍या दिवशी अमरावती शहरात अनेक टांग्‍यांवर भोंगे लावून नागरिकांना देण्‍यात आली होती.

हेही वाचा…देशभरात पूल बांधले…पण, नागपुरातील इवलाशा पूल मात्र तब्बल इतके दिवस…

त्‍यावेळी शहरातील अॅकेडमिक हायस्‍कूलमध्‍ये शिकत असलेले पिरकाची खोब्रागडे आणि सायन्‍सकोर हायस्‍कूलमध्ये शिकणारे धोंडोजी छापामोहन या दोन विद्यार्थ्‍यांनी मुंबईला अंत्‍यदर्शनासाठी जाण्‍याचा निर्णय घेतला. दोघेही बडनेरा रेल्‍वे स्‍थानकापर्यंत पायी चालत गेले. त्‍यावेळी बडनेरा येथे मुंबईसाठी एक डबा आधीच राखून ठेवण्‍यात येत होता. त्‍या डब्‍यात पिरकाजी आणि धोंडोजी हे चढले.

तासाभराने नागपूरवरून आलेल्‍या रेल्‍वेगाडीला हा डबा जोडण्‍यात आला आणि ही गाडी मुंबईच्‍या दिशेने निघाली. मुंबईपर्यंत या डब्‍यात प्रचंड गर्दी झाली होती. ही गाडी दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहचल्‍यानंतर पिरकाजी आणि धोंडोजी हे डॉ. बाबासाहेबांच्‍या अंत्‍ययात्रेत सहभागी झाले होते. अत्‍यंसंस्‍कारानंतर या दोघांनी दादर चौपाटीलगतच रात्रीच्‍या थंडीत मुक्‍काम केला. पहाटे अस्‍थी गोळा करण्‍यासाठी डॉ. बाबासाहेबांचे पुत्र यशवंत आणि इतर नातेवाईक आले. यावेळी दोघांनी बाबासाहेबांच्‍या काही अस्‍थी उचलल्‍या आणि खिशात ठेवल्‍या. अस्‍थी घेऊन हे दोघेही ९ डिसेंबरला अमरावतीत पोहचले.

हेही वाचा…बलात्काराच्या आरोपीची सुटका…न्यायालय म्हणाले, शिक्षेसाठी वैद्यकीय पुरावा पुरेसा नाही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिरकाजी आपल्या शाळेतील वस्तीगृहात न जाता थेट आपल्या नया अकोला ह्या गावी गेले आणि त्यांनी आईला सोबत आणलेल्या अस्थी दाखवल्या. त्यांच्या आईने बाबासाहेब केवळ आपलेच नव्हे, तर प्रत्येकाचे होते, असे म्हणत या अस्थी गावातील चौकात ठेवायला सांगितल्या. त्‍यानंतर ग्रामस्थांनी याबाबत एक बैठक घेतली. या अस्थी आदरपूर्वक एका ठिकाणी ठेवून त्यावर छोटासा ओटा बांधून त्यांचे जतन करून ठेवले. तेव्हापासून डॉ. बाबासाहेबांच्या अस्थी असणाऱ्या नया अकोला या गावात त्‍यांचे असंख्‍य अनुयायी दर्शनासाठी येतात.