लोकसत्ता टीम

गडचिरोली : पोलीस शिपायाचे अपहरण करून हत्या, जाळपोळ, आदी गुन्ह्यात आरोपी असलेल्या नक्षल समर्थकास (जनमिलिशिया) भामरागड येथे नाकाबंदीदरम्यान अटक करण्यात आली. पेका मादी पुंगाटी (४९, रा. मिरगुळवंचा, ता. भामरागड) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर दीड लाख रुपयांचे बक्षीस होते.

फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी ‘टीसीओसी’ कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे अशी कृत्ये करत असतात. टीसीओसी कालावधी तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दलाने २१ मार्च रोजी भामरागड परिसरात नाकाबंदी सूरू केली होती. क्युआरटी, सीआरपीएफचे जवान व भामरागड पोलीस कर्तव्य बजावत असताना नाकाबंदीच्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे निदर्शनास आले. त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता तो कुख्यात नक्षल समर्थक पेका पुंगाटी असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यास अटक केली.

आणखी वाचा- नागपुरात गडकरींच्या प्रचार कार्यालयात शिरण्याचा आप कार्यकर्त्यांचा प्रयत्न

१९ डिसेंबर २०२३ रोजी नक्षलवाद्यांनी हिद्दुर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ लावलेले ३ ट्रॅक्टर, एक जेसीबी पेटवून मजुरांना मारहाण व दमदाटी केली होती. या गुन्ह्यात तो सामील होता. सन २०१६ मध्ये एका पोलीस शिपायाचे अपहरण करुन खून केल्याच्या अनुषंगाने भामरागड येथे दाखल गुन्ह्यात देखील त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तो नक्षलवाद्यांना रेशनचे धान्य पुरविणे, गावातील लोकांना मिटींगसाठी बळजबरी गोळा करणे, सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे करीत होता, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अमर मोहिते व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.