बुलढाणा : मागील दोन महिन्यांपासून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राजकीय संभ्रम निर्माण करून मित्रपक्ष आणि विरोधकांना बुचकळ्यात पाडण्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे डावपेच यशस्वी ठरले. यानंतर कालपरवा कार्यकर्ता मेळावा घेऊन तुतारी हाती घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या पाठोपाठ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्या शरद पवार गटात जाण्यावर शिक्कामोर्तब झाले असून आजच त्यांचा रीतसर पक्षप्रवेश होणार आहे. या संदर्भात आज ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केलेले वृत्त तंतोतंत अचूक ठरले आहे. शिंगणे काल दिवसभर सिंदखेड राजा मतदारसंघात होते. त्यांनी मतदारसंघाचा ‘अंतिम कानोसा’ घेत मोजक्या पदाधिकारी आणि काही ज्येष्ठ राजकारणी मंडळींशी सल्लामसलत केली. यानंतर काल रात्री ते

मोजक्या समर्थकांसह

राजधानी मुंबईकडे रवाना झाले. मात्र आपल्या नेहमीच्या ‘सावध धोरण’ला अनुसरुन मोजके विश्वासू सोडले तर त्यांनी इतरांना याची माहिती होऊ दिली नाही. आज सकाळी दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर दुपारी ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दाखल झाले. आज संध्याकाळी पाच वाजताच्या आसपास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटात) मध्ये त्यांचा औपचारिक प्रवेश होणार आहे. त्यांच्या प्रवेशाची आतुर प्रतीक्षा करणाऱ्या सिंदखेड राजा मतदारसंघातील हजारो समर्थक आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषाची जय्यत तयारी केली आहे. आज संध्याकाळी मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघात दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होणार हे नक्की.

हे ही वाचा…चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात एक ठार

आपण शरीराने अजितदादा सोबत आणि मनाने मात्र शरद पवार साहेबांसोबत असल्याचे सुतोवाच अनेक वेळा करणारे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा ‘मोठ्या साहेबां’कडे अर्थात शरद पवार यांच्याकडे परतले आहे. त्यामुळे सिदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. वर्तुळ पूर्ण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजभवनवर झालेल्या बहुचर्चित पहाटेच्या शपथविधी झाल्याचे नाट्य घडले होते. अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या शपथविधीला काही तासांचा काळ उलटत नाही तोच सगळ्यात पहिल्यांदा शरद पवारकडे परतणारे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे पहिले आमदार होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये त्यांना अन्न व औषध प्रशासन खात्याचे कॅबिनेट मंत्री पद मिळाले. एकनाथ शिंदे पाठोपाठ अजितदादा पवार हे महायुतीमध्ये सामील झाले.

हे ही वाचा…सावधान ! बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ

आमदार शिंगणे शरद पवार गटातच राहतील अशी दाट शक्यता होती. मात्र या शक्यता चुकीच्या ठरवीत शिंगणे जिल्हा बँकेला ३०० कोटींच्या सॉफ्ट लोन च्या मागणीसाठी त्यांनी अजित दादांच्या गोटात सामील झाले. मात्र तिथेही त्यांचे मन काही रमले नाही.आपण शरद पवाराना मानतो हे काही त्यांनी लपवून ठेवले नाही. काल-परवा मतदारसंघात त्यांनी घेतलेला कार्यकर्ता मेळावा आणि ९० टक्के कार्यकर्त्यांची मागणी त्यांनी उघडपणे माध्यमांसमोर येऊन सांगितली. त्यामुळे ते शरद पवार सोबत जातील हे जवळपास निश्चित झालं होतं. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले.

Story img Loader