नागपूर : राज्यात अलीकडच्या काही वर्षात वाघांच्या हल्ल्यापाठोपाठ बिबट्यांच्या हल्ल्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे आता मानव-वाघ संघर्षासोबत मानव-बिबट संघर्ष देखील वाढला आहे. वाघाच्या हल्ल्यांनी केव्हाच दुहेरी आकडेवारी गाठली होती. मात्र, गेल्या पाच वर्षात बिबट्याचे हल्ले देखील दुहेरी आकडेवारीपर्यंत पोहोचले आहेत. मार्च २०२४ पर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात ९९ मृत्यूंची नोंद झाली आहे.

विदर्भात वाघांची संख्या अधिक तर पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या अधिक आहे. २०२२च्या गणनेनुसार राज्यात बिबट्यांची संख्या १९८५ इतकी आहे. २०१८च्या गणनेत ती १६९० इतकी होती. राज्यात जुन्नर पाठोपाठ सातरा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुक्यात बिबट्यांची संख्या अधिक आहे. विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प, मेळघाट याठिकाणी बिबट्यांची संख्या अधिक नोंदवण्यात आली. तर जुन्नर, अहमदनगर, मालेगाव, यावल आणि नाशिक वनविभागातील वनक्षेत्रात बिबट्यांची संख्या अधिक आढळून आली. राज्यात पुणे, सातारा, नाशिक, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सोलापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात ऊसाच्या शेतीत, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आंबा, काजूच्या बागांमध्ये बिबट्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्याठिकाणी शेतीची कामे अधिक आहे, त्याठिकाणी बिबट्यांचे हल्ले अधिक आहेत. २०२३ मध्ये धुळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच मुलांचा मृत्यू झाला होता. प्रामुख्याने उसाच्या मळ्यात बिबट सहजपणे लपून बसतात. उसाच्या शेतात मानव व बिबट हा संघर्ष अधिक वाढला आहे. बिबट्यांची संख्या आता केवळ राखीव वनक्षेत्रातच नाही तर नवीन प्रदेशातही विस्तारत आहे.

हेही वाचा…“…हा तर आघाडीचा रडीचा डाव अन् स्टंटबाजी,” भाजप आमदार श्वेता महालेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…

वाढती संख्या ठरणार धोकादायक?

२०२४ मध्ये पहिल्या तीन महिन्यातच बिबट्यांच्या हल्ल्यात १५ मानवी मृत्यूंची नोंद झाली. वाघांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात बिबट्यांचे हल्ले कमी होतात असे सांगितले जाते. मात्र, २०२३ या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या अधिक असणाऱ्या क्षेत्रात बिबट्याच्या हल्ल्यात सात मृत्यू झाले. वाढणारी बिबट्यांची संख्या भविष्यात धोक्याची घंटा ठरण्याची भीती अभ्यासक व्यक्त करत आहे.

हेही वाचा…करोनापश्चात आजही थकवा, अशक्तपणा; अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. पंडित म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्याच्या नसबंदीवर गांभीर्याने विचार करावा लागणार

उसाचे क्षेत्र मोठे असल्याने तोच बिबट्यांचा अधिवास होऊ पाहात आहे. शासनाने जे काही उपाय सुचवले आहेत, ते संघर्ष थांबवण्यासाठी पुरेसे नाहीत. या उपायांना बिबट सरावले आहेत. त्यामुळे बिबट्यांच्या नसबंदी कार्यक्रमावर वनविभागाला गांभीर्याने विचार करावा लागेल. यावर शास्त्रीय संशोधन होणेदेखील आवश्यक आहे, असे सातारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे म्हणाले.