नागपूर : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार त्या काळातील परिस्थितीनुरूप होते. त्यांच्या विचारांची चिकित्सा, समीक्षा करून आज त्या विचारांचा कसा उपयोग करता येईल हे बघणे गरजेचे आहे. बाबासाहेबांना आपण एका काळाच्या चौकटीत बंदिस्त केले तर तो समाजासाठी आत्मघात ठरेल, असे प्रतिपादन हावर्ड आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. सूरज एंगडे यांनी केले.
आवाज इंडिया टीव्हीच्या वतीने जातिअंत, समानता आणि भारतीयांची भूमिका या विषयावर सीताबर्डी येथील हिंदी मोर भवन येथे शनिवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.
एंगडे म्हणाले, महामानवांच्या विचारातील मर्म समजून घेण्यासाठी आधी त्यांच्या विषयीचा भक्तीभाव दूर सारावा लागेल. त्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांची चिकित्सा करावी लागेल. म्हणून हे विचार ज्यांनी अतिशय चांगल्याप्रकारे अभ्यासून समाजासमोर आणले त्यांचे अभिनंदन करतो. याचा अर्थ मी बाबासाहेबांवर टीका करतो किंवा त्यांचे विचार नाकारतो असे अजिबात नाही. पण वैचारिकदृष्ट्या समाजाला संपन्न करायचे असेल तर त्या विचारातून नवीन विचार तयार झाले पाहिजेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.