नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) शल्यक्रियाशास्त्र विभागाचा विद्यार्थी डॉ. यश जैन हा नीट सुपरस्पेशालिटी परिक्षेत देशात पहिला आला आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील इतिहासात देशात पहिला येणारा डॉ. यश जैन पहिलाच असल्याचा दावा मेडिकल प्रशासनाने केला आहे.

डॉ. यश जैनचे वडिल सुनील यांचे इलेक्ट्रिकलेच दुकान असून आई गृहिनी आहे. डॉ. यशचा लहान भाऊ सीए आहे. डॉ. यशचा जन्म ओरीसातील कांताबांजी या लहानश्या गावात झाला. तेव्हा येथील लोकसंख्या केवळ २० हजाराच्या जवळपास होती. दरम्यान या गावातील नागरिकांना प्रसूतीसाठीही १०० ते सवाशे किलोमिटर जावे लागत होते. त्यामुळे डॉ. यशच्या आजोबांची कुटुंबात एक डॉक्टर हवा अशी इच्छा होती. ती डॉ. यश याने पूर्ण केली. त्यामुळे डॉ. यश या गावातून पहिला डॉक्टरही ठरला. त्याने एमबीबीएसचे शिक्षण मुंबईतील के. ई. एम. महाविद्यालयातून केले.

पदव्यूत्तरच्या प्रवेश पू‌र्व परिक्षेत चांगले गुण मिळाल्यावर त्याने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया विभागात प्रवेश घेतला. डॉ. राज गजभिये यांच्या अखत्यारित पदव्यूत्तर अभ्यासक्रम करतांनाच त्याने आणखी पुढचे शिक्षण घेण्यासाठी नीट सुपरस्पेशालिटीची परीक्षा दिली. या अभ्यासक्रमाच्या देशभरपात केवळ २ ते अडिच हजार जागा आहे. तर ही परीक्षा देशातील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी दिली. त्यात डॉ. यश जैन देशात पहिला आला आहे. त्याने ६०० पैकी ४९८ गुण मिळवल्याची माहिती नागपुरातील मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली. डॉ. यश जैन म्हणाला, त्याला गॅस्ट्रो सर्जरीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. हा अभ्यासक्रम झाल्यावर तो शहराबोरतच आपल्या गावातही सामाजिक कार्य म्हणून सेवा देणार आहे. या यशाचे श्रेय त्याने मेडिकलचे अधिष्ठाता व त्याचे गाईड डॉ. राज गजभिये यांना दिले.

दरम्यान मेडिकलला डॉ. यश जैन यांचा अधिष्ठाता डॉ. राज गजभिये व वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सत्कारही केला. याप्रसंगी डॉ. हेमंत धानारकर, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. विक्रांत आकुलवार, डॉ. भूपेष तिरपुडे, डॉ. विपीन कुरसुंगे, डॉ. नवीन सोनवने, डॉ. पराग खंडाईत, डॉ. जाधव उपस्थित होते.

डॉ. यश जैन म्हणतो…

देशातील शासकीय रुग्णालयातील पहिल्या रोबोटिक सर्जरी युनिटमुळे नागपुरातील मेडिकलमध्ये डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वात खूप शिकायला मिळाले. त्याचा निश्चितच माझ्या भविष्यातील शिक्षणासाठी लाभ होईल. दिल्लीतील मौलाना आझाद महाविद्यालयात गॅस्ट्रो सर्जरीमध्ये पुढिल शिक्षण घ्यायचे आहे. देशात सुमारे ४० ते ५० जागाच या विषयाच्या असतात, असे डॉ. यश जैन याने सांगितले.