कायद्यानुसार कारवाई आवश्यक

गांजा, चरस, हेरॉईन, ब्राऊन शुगर, कोकेन आदी अंमली पदार्थाद्वारेच नशा करता येते, असे नाही तर घरांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑयोडेक्स, ग्लुस्टिक, नेलपेंट, व्हाईटनरचा वापर अंमली पदार्थ म्हणून केला जात असल्याने व त्याला अल्पवयीन मुले बळी पडत असल्याने चिंता वाढली आहे.

जवळपास अडीचशे प्रकारच्या अंमली पदार्थाना देशात बंदी घालण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने गांजा, चरस, हेरॉईन, ब्राऊन शुगर, कफ सिरप, कोकेन, एमडी, अफीम आदींचा त्यात समावेश आहे. मात्र, या व्यतिरिक्तही अनेक पदार्थ नशेकरिता वापरण्यात येतात. ऑयोडेक्स, ग्लुस्टिक, नेलपेंट, व्हाईटनर, स्प्रेपेंट आदींपासूनही नशा करता येते. या सर्व वस्तू घराघरांमध्ये उपलब्ध आहेत. शाळकरी व अल्पवयीन मुले अशा वस्तूंचा नशेकरिता वापर करीत असल्याचे प्रकार उघड होत असून देशाच्या ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने  ही बाब गांभीर्याने घेतली आहे. या पदार्थाच्या विक्रीवर बंदी नाही. ते औषध किंवा इतर दुकानात सहज मिळते. मागील आठवडय़ात नागपुरातील ‘एन-कॉप्स एक्सलंस’ येथे गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पश्चिम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी यंत्रणांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी या विषयावर चर्चा करण्यात आली. या पदार्थाद्वारे नशा करणाऱ्यांवर कारवाई कशी करणार, हा प्रश्न अंमली पदार्थ विरोधी यंत्रणांच्या समोर उभा ठाकला आहे.

अशी केली जाते नशा

ब्रेडवर ऑयोडेक्स लावून खाल्ले जाते. कफ सिरप एकावेळी एक बॉटल प्यायलावर नशा होते, तर व्हाईटनर, नेलपेंट, स्प्रे पेंट, ग्लू स्टीक यांचा वारंवार वास घेऊन नशा करण्यात येते. या पदार्थाचा वापर करण्याचे सर्वाधिक प्रमाण शाळकरी व महाविद्यालयीन तरुणाईमध्ये आहे. नशेच्या आहारी गेलेले तरुण नंतर गांजा, चरस, ब्राऊन शुगर, कोकेन घेतात.

आईवडिलांनी काळजी घ्यावी

अल्पवयीन व तरुण मुले लहानपणापासून आई-वडिलांच्या सान्निध्यात असतात. मात्र, अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या मुलांच्या स्वभावात झपाटय़ाने बदल होतो. त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध काही घडल्यास ते चिडचिड करतात. मुलांमध्ये अशाप्रकारचे बदल दिसून आल्यावर आईवडिलांनी अधिक सजग व्हावे. मुलगा अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे समजताच वेळीच त्यांच्यावर डॉक्टरांमार्फत उपचार करावेत. यासाठी पोलिसांकडूनही जनजागृतीही करण्यात येत आहे.

राजेंद्र निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक.

शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती

घराघरांमध्ये सहज उपलब्ध पदार्थामधूनही नशा केली जाते हे लोकांना सांगावे लागले. त्यासाठी जनजागृती करणे हाच एक पर्याय आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांमध्ये पथनाटय़ करून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. यातून मुलांच्या पालकांनाही संदेश दिला जातो. मात्र, अशा अंमली पदार्थावर नियंत्रण आणण्यासाठी पालक जागृत असणे आवश्यक आहे. कायद्यात अशा अंमली पदार्थाविरुद्ध कारवाई करण्यासाठी काहीही तरतुदी नाहीत.

कुमार संजय झा, उपसंचालक, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो.