अनिल कांबळे

नागपूर : शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही लागल्यापासून वाहतूक पोलीस ई-चालान करीत दंडात्मक कारवाई करतात. गेल्या जानेवारी ते आक्टोबर महिन्यांपर्यंत तब्बल ६ लाख ८६ हजार चालान ‘पेंडिंग’ आहेत. केवळ १ लाख ४३ हजार चालान भरण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपूर्वी ई-चालान आल्यानंतर भरणाऱ्यांचे प्रमाण फक्त ३० ते ४० टक्के होते. त्यामुळे अजूनही वाहतूक विभागाचे लाखो चालान ‘पेंडिंग’ आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यांपर्यंत शहर वाहतूक पोलिसांनी जवळपास ८ लाखांच्यावर ई चालान केले आहेत. त्यापैकी १ लाख ४३ हजार १०७ वाहनधारकांनी इ-चालान भरलेले आहे. तर ६ लाख ८६ हजार ३२९ चालान अद्यापही भरल्या गेले नाही. मात्र, दिवाळीच्या तोंडावर वाहतूक पोलिसांनी पाठवलेल्या ई-चालानचा दंडाची रक्कम भरण्यास नागरिकांनी थोडाफार सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सीसीटीव्हीच्या माध्यमातून ई-चालान वाहतूक पोलीस पाठवत आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेल्या वाहनांच्या क्रमांकावरून वाहनमालकाच्या नावाने ई-चालान पाठवण्यात येत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत ई-चालान भरणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्केच होते. त्यामुळे ७० टक्के ई-चालान ‘पेंडिंग’ दिसत होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली होती.

हेही वाचा >>> नागपूर: भाजप नेत्याचा खून करणाऱ्या दोघांना अटक; बोनस न दिल्यामुळे नोकरांनी गळा चिरला

 त्यानंतर पॉस ई-चालान मशीनने वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करायला लागले. त्यात वाहनचालकांशी कोणताही संवाद न साधता केवळ छायाचित्र काढून चालान पाठवण्यात येत होते. मात्र,‘पेंडिंग’ असलेल्या ई-चालानची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक विभागाने आता ई-चालानचा भरणा वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली. ‘पेंडिंग’ चालान न भरणाऱ्यांचे वाहन जप्त करण्याचा सपाटा वाहतूक पोलिसांनी लावला. त्यामुळे वाहतूक विभागाच्या या दडपशाहीमुळे चालान भरणाऱ्यांची संख्या वाढली. चालान न भरणाऱ्यांचे वाहन वाहतूक शाखेत जप्त ठेवण्यात येत होते. त्या दंडुकेशाहीमुळे चालन भरणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली आहे.

वाहनचालकांसोबतचे वाद कमी

पूर्वी वाहतूक पोलीस वाहनचालकांना थांबवून त्यांच्याकडील कागदपत्रे तपासून दंडाची पावती तयार करीत होते. त्यामुळे वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये नेहमी वाद होत होते. ते वाद होऊ  नये म्हणून पोलिसांनी बॉडी वोर्न कॅमेरा वापरण्यास सुरुवात केली. मात्र, आता थेट छायाचित्र काढून चालान पाठवण्यात येत असल्यामुळे पोलीस आणि चालक यांच्यातील वाद कमी झाले.

जुने चालान वसुलीचे अधिकार आहेत का?

वाहतूक पोलिसांनी केलेले चालान वाहनचालकाने भरणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांच्यावर न्यायालयातून कायदेशीर कारवाई करण्यात येते. मात्र, वाहतूक पोलीस जुने चालान भरण्यासाठी बळजबरी करतात. जुने चालान वसुली करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना नाहीत. तरीही पोलीस चिरीमिरीसाठी अडवणूक करीत वाहनचालकांना वेठीस धरीत असल्याची माहिती समोर आली.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस ई-चालान पाठवतात. ते चालान भरणे वाहनचालकांना बंधनकारक आहे. गेल्या काही महिन्यांपासून ई-चालान भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, अन्यथा सीसीटीव्हीच्या माध्यमातून ई-चालान पाठवण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– विनोद चौधरी, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.