नागपूर : वातावरणातील बदलामुळे उपराजधानीत सध्या घरोघरी सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहे. यापैकी अनेकांना कानदुखीचा त्रास होत असल्याचे निरीक्षण उपराजधानीतील डॉक्टर नोंदवत आहेत. या विषयावर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण शिंगाडे म्हणाले, नागपुरात यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक पाऊस पडला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी तापमानात बदल होत थंडी वाढली होती. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा तापमानात किंचित वाढ झाली.

नागपूर: भारत जोडो यात्रे दरम्यान नागपूरच्या काँग्रेस नेत्याचा हृदयविकाराने मृत्यू

तापमानातील सातत्यपूर्ण बदलामुळे हल्ली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह (मेडिकल) इतरही खासगी रुग्णालयांत सर्जी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहे. यापैकी अधिक सर्दी असलेल्यांना कान-नाक-घशातील वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन त्यांचे कान दुखण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील औषधशास्त्र व कान-नाक-घसा रोग तज्ज्ञांकडे रुग्णांची गर्दी वाढली. प्रत्येकाने ताजे आणि प्रोटिनयुक्त अन्नपदार्थ घेण्यासह थंडीपासून बचावाची काळजी घेतल्यास हा आजार टाळणे शक्य असल्याचेही डॉ. प्रवीण शिंगाडे यांनी लोकसत्ताला सांगितले.