नागपूर : पंचतारांकित हॉटेलमधील ‘शेफ’ ला लाजवेल असे एक, दोन प्रकारचे नाही तर तब्बल ३०पेक्षाही अधिक प्रकारचे सूप उपराजधानीतील अवघ्या पंचेविशीतील केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली एक तरुणी तयार करते. ती फक्त तयारच करत नाही तर शहरातल्या वेगवेगळ्या चौकात जाऊन विकते. आता तर तिच्या या ‘सूपी’चे नागपूरकर चाहते झाले आहेत.

एखाद्या पुस्तकात वाचलेली किंवा चित्रपटात पाहीलेली ही कथा नाही, तर उपराजधानीतील सोनम गोतमारे या तरुणीने नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणाईला दाखवलेली वाट आहे. खरे तर केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत ती आरामात आयुष्य घालवू शकली असती, पण तिने वेगळी वाट निवडली. करोनानंतर नागरिक आरोग्याप्रती अधिक सजग झाले आहेत, मग त्यांचे आरोग्य आणखी ‘हेल्दी’ करण्याचा विडा तिने उचलला. अर्थातच तिच्या घरच्यांसाठी हे ‘वेड’ होते, पण तिच्या या ‘वेडा’पुढे त्यांना काही बोलता आले नाही. नागपूरकरांसाठी आरोग्यदायी काय तर सूप आणि ते ही किती प्रकारचे तर तब्बल ३० हून अधिक.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अगदी जांभळापासून तर शेवग्याच्या शेंगांपर्यंतचे सूप सोनम तयार करते. कोणत्याही रसायनांचा वापर न करता अगदी शुद्ध आणि वेगवेगळ्या चवीचे सूप प्यायला लोकांची गर्दी होते. ‘सूपी’ या नावाने तिचा हा ब्रँड आता प्रसिद्ध झालाय. शहरातील कोणत्याही चौकात ‘सूपी’ दिसले की लोकांची पावले वळलीच म्हणून समजा. आज हजारो तरुण नोकरीमागे धावतात, निराश होतात, सोनम ना नोकरीमागे धावली, ना निराश झाली, ना मुलगी म्हणून मी चौकात माझा ब्रँड कसा विकू म्हणून हताश झाली. कारण लोकांना आरोग्यदायी देणे हाच तिचा ध्यास होता. तिला त्यात रस होता आणि म्हणून जिद्दीने ती या व्यवसायात उतरली. सोनम गोतमारेचा हा ‘सूपी’ उपराजधानीला नक्कीच ‘वेड’ लावत आहे.