अकोला : गणपती विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलादनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांच्या निमित्ताने शहरात हिंदू – मुस्लिम एकात्मतेचा अनोखा संदेश देण्यात आला आहे.शहरात सौहार्द व सामाजिक एकोप्याला प्राधान्य देत गणेशोत्सवामुळे ईद ए मिलादची मिरवणूक तीन दिवस पुढे काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. दोन्ही समाजाकडून एकमेकांच्या पारंपरिक मिरवणुकीचे स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती मुस्लिम समाजाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

अत्यंत संवेदनशील म्हणून अकोला शहर ओळखले जाते. शहराला हिंसक दंगलीची पार्श्वभूमी आहे. मात्र, आता शहराची ओळख बदलत आहे. सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून या दिवशी शहरातून गणपती विसर्जन मिरवणूक काढण्याची मोठी परंपरा आहे.

मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद ५ सप्टेंबर रोजी आहे. या सणानिमित्त मुस्लिम समाजाकडून देखील शहरातून मिरवणूक काढली जाते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने आपली मिरवणूक पुढे ढकलून ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ताजनापेठ कच्छी मशिदीसमोरून पारंपरिक मार्गाने काढण्याचा निर्णय घेतला. सलग तिसऱ्या वर्षी मुस्लिम समाजाने हा निर्णय घेऊन हिंदू – मुस्लिम एकतेचा आदर्श घालून दिला.

‘रबी उल अव्वल’ महिन्याच्या १२ व्या दिवशी ईद ए मिलाद साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम समाजाकडून विविध सेवाभावी उपक्रम राबवले जातात, अशी माहितीही समितीकडून देण्यात आली. यावेळी आमदार साजिद खान पठाण, ईद मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदाम खान, सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक समितीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंग मोहता, सचिव ॲड. एस. एस. ठाकुर, कच्छी मशिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकरिया, शेख सलीम सदर गोरवे आदींसह मिरवणूक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदू-मुस्लिम समाज पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणार

गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये ताजनापेठ येथे मुस्लिम समाजाकडून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे, तर गांधी चौकात गणेशोत्सव मंडळाकडून ईद ए मिलादच्या मिरवणूक समितीचा सत्कार करण्यात येईल.

उत्सव एकत्र आल्यास…

गेल्या दोन वर्षांमध्येही उत्सव एकत्र आल्यावर मुस्लिम समाजाने आपली मिरवणूक पुढे ढकलून दोन्ही समाजाच्या एकात्मतेला प्राधान्य दिले. यावर्षी देखील ती परंपरा कायम ठेवत हिंदू – मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला जात असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.