वर्धा : सेनेत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांचे प्रत्येक जिल्ह्यात सवतेसुभे तयार झाले. कोण कोणाकडे हे जिल्हा पातळीवर काही काळ समजेनासे झाले. मात्र सत्ताधारी शिंदे गट सत्तेमुळे अधिक सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली. आमचा नेता कसा मोठा हे सांगण्याची चढाओढ लागली. त्याचाच हा दाखला. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या अनुषंगाने शिवसेनेची जिल्हा आढावा बैठक विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत शिंदे सेनेचे विदर्भ सह-समन्वयक बंडूभाऊ तागडे हे हजर झाले होते.
या बैठकीला प्रमुख पाहुणे लोकसभा संपर्क प्रमुख राज दीक्षित होते तर जिल्हा समन्वयक अनिल देवतारे, लोकसभा संघटक रविकांत बालपांडे, सह-संघटक गणेश इखार,जिल्हा प्रमुख राजेश सराफ व प्रशांत शहागडकर, जिल्हा संघटक संदीप इंगळे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख शुभांगी ठमेकर, नगरसेवक नितीन दर्यापूरकर,माजी जिल्हाप्रमुख श्रीकांत मिरापूरकर, वैद्यकीय मदत कक्षाच्या महिला जिल्हा प्रमुख शाजिया इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आढावा बैठकीला संबोधित करतांना तागडे म्हणाले की मागील ३५ वर्षांपासून मी शिवसेनेचे काम करीत आहे. एक सर्वसामान्य परिवारातून मी राजकारणात आलो. शिवसेनेत संघटनात्मक काम करीत असतांना मी अनेक संकटाचा सामना केला. परंतु एकनाथ शिंदे यांचे उदिष्ट कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे असल्यामुळे ते प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहले. हेच सांगण्यासाठी मी इथे आज आलो. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायतच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या हक्काच्या निवडणूका आहे. त्या निवडणुकीत मोठया प्रमाणात क्षमतावान शिवसैनिकांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या शाखा वाढवा असे तागडे यांनी आवाहन केले. एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांना जपतात. त्यांना मोठे करतात. त्यांचे हात बळकट केले पाहिजे.यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख राज दीक्षित व व्यासपीठावर उपस्थित अन्य नेत्यांची भाषणे झाली. यावेळी वैद्यकीय कक्ष पण सूरू करण्यात आला.
बैठकीला रोशन राऊत, दशरथ जाधव, गिरधर ठवरी, रविंद्र धोटे, कमलेश कठाने, भगवान बुवाडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. संचालन प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे यांनी केले.