वर्धा : केवळ राजकीय क्षेत्रच नव्हे तर समाजातील सर्वच क्षेत्रास कवेत घेणारा उपक्रम म्हणजे निवडणुका. प्रत्येक निवडणूक चुरशीची होत असल्याने सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागलेले असते. म्हणून मतदार नोंदणी पासून ते निकाल लागेपर्यंत प्रत्येक संबंधित लक्ष ठेवून असतो.
आता निवडणूक आयोगाने राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर करीत एकप्रकारे या निवडणुकीचा जणू बिगुलच फुंकला आहे. लागा कामाला, असा संदेश देणारा कार्यक्रम ठरतो. या दोन्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत ठराविक मतदार असतात. राजकीय चिन्ह नव्हे तर कोण पाठीराखे यांस महत्व असते. अर्थात महायुती किंवा महाआघाडी असे बॅनर चिपकतेच. म्हणून राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक लढवितात.
प्रत्यक्ष निवडणुकीस वर्ष बाकी असले तरी मतदार नोंदणी मात्र सूरू होणार. तसा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २०२६ मध्ये रिक्त होणाऱ्या औरंगाबाद, पूणे व नागपूर पदवीधर तसेच अमरावती व पूणे शिक्षक मतदारसंघात निवडणुका होणार. सध्या अनुक्रमे या मतदारसंघात सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी व शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक व जयंत आसगावकर हे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.
मात्र त्या निवडणुकीची तयारी आता सूरू झाली आहे. त्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरला पब्लिक नोटीस निघणार. १५ ऑक्टोबरला वृत्तपत्रात अधिकृत प्रकाशित केल्या जाणार. आक्षेप २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान नोंदविता येणार. मतदार यादी अधिकृतपणे ३० डिसेंबर रोजी प्रकाशित केल्या जाणार आहे. विदर्भात नागपूर पदवीधर मतदारसंघ व अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक होणार.
नागपुरातून महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी हे आमदार आहेत. ते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हटल्या जाणारे माजी महापौर संदीप जोशी यांचा पराभव करून निवडून आले होते. मावळते आमदार अनिल सोले यांची तिकीट कापून जोशी यांना तिकीट देण्यात आल्याने भाजप वर्तुळत चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे काँग्रेस व मित्र पक्षांनी या निवडणुकीत एकी दाखवीत वंजारी यांना निवडून आणले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असतांना या मतदारसंघात हा बदल घडला होता.
भाजपचा गड प्रथमच ढासळल्याने चांगलीच चर्चा झाली होती. तर अमरावती मतदारसंघात महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांचा पराभव करीत अपक्ष असलेले किरण सरनाईक आमदार बनले होते. या निवडणुकीत ‘ पैठणी ‘ वाटप चांगलेच गाजले. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या जाणार, हे स्पष्ट आहे. पाच विधानपरिषद मतदारसंघात होणाऱ्या निवडणुका सत्ताधारी महायुतीची परीक्षा घेणाऱ्या ठरणार कां, असा प्रश्न चर्चेत आला आहे.