नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच नागपुरात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने अधिवेशनाच्या धामधुमीतच सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला, उमेदवार ठरविण्यापासून तर त्याला विजयी करण्यापर्यंतची सर्व जुळवाजुळव करावी लागणार आहे. विशेष म्हणजे निवडणुकीचा जाहीर झालेला कार्यक्रम लक्षात घेतला तर आजपासून फक्त एकच महिना शिल्लक असल्याने पुढच्या काळात नागपूर जिल्ह्य़ातील राजकारण अधिवेशन आणि निवडणुकीच्या राजकारणामुळे चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका मंगळवारी जाहीर झाल्या. त्यानुसार २७ डिसेंबरला मतदान होणार असून ३० डिसेंबरला मतमोजणी होईल. २ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, १२ डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. सध्या नागपूरला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वेध लागले आहेत.
७ डिसेंबरपासून सुरू होणारे अधिवेशन यंदा तिसऱ्या आठवडय़ापर्यंत चालणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण सरकारच नागपुरात दाखल होत असल्याने सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांचे कामे मार्गी लावण्याच्या प्रयत्नात तर विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपले अस्तित्व दाखवून देण्याच्या प्रयत्नात विरोधी पक्ष असतात. आता विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय धावपळीलाही गती येणार आहे.
या निवडणुकीतील जय-पराजयात महत्त्वपूर्ण भूमिका ही अर्थकारण ठरवित असल्याने या क्षेत्रात भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या उमेदवाराची निवड दोन्ही पक्षाकडून केली जाण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये ‘अशा’ उमेदवारांची गर्दी असली तरी काँग्रेसमध्ये मात्र मोजकीच नावे आहेत.
१२ डिसेंबरनंतर या निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार असले तरी मोर्चेबांधणीला मात्र अधिवेशन संपल्यावरच वेग येण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे सात दिवस हे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच अधिवेशन संपल्यानंतरही विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळेल.
सध्या ही जागा काँग्रेसकडे असून राजेंद्र मुळक हे या जागेचे प्रतिनिधित्व करतात. सहा वर्षांपूर्वी त्यांनी अतिशय अटीतटीच्या लढतीत भाजपचे मानकर यांचा पराभव केला होता. तेव्हा काँग्रेस सत्तेत होती. आता भाजप सत्तेत आहे. मुख्यमंत्री स्वत: या निवडणुकीत लक्ष घालणार आहेत.
मात्र या निवडणुकीचा इतिहास लक्षात घेतला तर यापूर्वी मुख्यमंत्र्याचा उमेदवार म्हणून काँग्रेस नेते अनंत घारड यांनी निवडणूक लढविली होती व त्यांचा पराभव झाला होता.