शहरात दोन दिवसात ९० दुचाकींची विक्री

नागपूर : शहरात पेट्रोलच्या किंमती वाढल्याने अनेक नागपूरकरांनी आता इलेक्ट्रिक दुचाकी वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे शहरात दोन दिवसात ९० दुचाकींची विक्रमी विक्री झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने इंधनाचे दर वाढत आहेत.  १०७ रुपये प्रतिलिटर पेट्रोल परवडणारे नाही. त्यामुळेच नागपूरकरांनी  इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर भर दिला आहे.

पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक दुचाकी परवडणारी आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यायावर वाहन ४० ते ९५ किमी धावते. बाजारात बजाज, हिरोसारख्या नामांकित कंपन्यांनी देखील आपले उत्पादन वाढवले आहे. त्याशिवाय इतरही कंपन्या जसे यो बाईक, बजाज चेतक या दुचाकींची खरेदी जोरात सुरू असून पूर्व नोंदणी वाढल्या आहेत. चाळीस किलोमीटर प्रतितास धावणाऱ्या इलेक्ट्रिकच्या यो बाईकसाठी वाहन चालवण्याचा परवाना लागत नाही. त्याशिवाय आरटीओमध्ये त्याची नोंदणी करावी लागत नाही. त्याशिवाय मोबाईल फोन चार्जिगची व्यवस्था असल्याने युवकांना ती पसंत येत आहे. सोबतच सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे उत्पादनही वाढले आहे. हे वाहन पर्यावरणपूरक आहे. या दुचाकींमध्येही विविध प्रकार असून शहरात या वाहनांची दालनेही वाढली आहेत. ५५ हजारांपासून तर एक लाखांच्या घरात ही वाहने उपलब्ध आहेत. करोनाच्या निर्बंधामुळे बाजापेठांच्या वेळा कमी होत्या. मात्र आता बाजारपेठा सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ झाली आहे. त्यामुळे विक्रीत आणखी भर पडेल, असे विक्रेता हिमांशू पंडित यांनी सांगितले.