नागपूर : महावितरणने गेल्या दहा महिन्यात प्रतीक्षा यादीतील एक लाखावर शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणी दिली आहे. महावितरणने १ एप्रिल २०२२ ते ३० जानेवारी २०२३ पर्यंतच्या काळात जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रतीक्षायादीतील १ लाख ४ हजार ७०९ शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली. त्यापैकी सुमारे ५४ हजार जोडण्या गेल्या तीन महिन्यांत दिल्या. कृषी पंपासाठी वीज जोडणीकरिता अर्ज करून शुल्क भरल्यानंतर जोडणी मिळण्यासाठी काही वेळ लागतो. याला ‘पेड पेंडिंग’म्हणतात.
हेही वाचा >>> धक्कादायक! अटक न करण्यासाठी मागितली लाच
ऊर्जा खात्याची सूत्रे स्वीकारल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवण्याची सूचना महावितरणला केली. त्यानुसार महावितरणने गेल्या सहा महिन्यात विशेष नियोजन करून वीज जोडणी देणे सुरू केले. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ३१ मार्च २०२३ पर्यंत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी जोडण्या देण्यात येईल, असे महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.