२००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. सरकारी-निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदा, शासनाचे अनुदान घेणारी महानगरपालिका, नगरपालिका, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर असे जिल्ह्यातील हजारो कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यांनी मंगळवारी दुपारी ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, असा नारा देत शहरातून पदयात्रा काढत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
हेही वाचा >>>गोंदिया : ‘देशभरात दलितांवरील अत्याचारात वाढ’ ; राष्ट्रपतींना २१ मागण्यांचे निवेदन सादर
जिल्हाधिकारी कार्यालयापासून कर्मचाऱ्यांनी पदयात्रा काढली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय, अशोक वाटिका, मतदनलाल धिंग्रा चौक या गांधी रोड या मार्गाने पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कर्मचारी संघटनांनी मंडप टाकून आंदोलन केले. संपामुळे शिक्षणासह आरोग्य सेवाही प्रभावित झाली. शासकीय कार्यालयात शुकशुकाट आहे. आरोग्य यंत्रणेने तुर्तास कंत्राटी पद्धतीवर कार्यरत कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय सेवेचे नियोजन केले. दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत.