भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हिवरा या गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे बांधकाम कागदपत्रांवर दाखवून सरकारी निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे.
कागदपत्रांमध्ये दाखवलेल्या या रस्त्यावर प्रत्यक्षात कोणतेही मातीकाम करण्यात आले नव्हते. रॉयल्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सरकारी निधीचा अपहार करण्यात आला. १५ ते २० गावातील रहिवाशांची नावे मस्टर रोलमध्ये मजूर म्हणून नोंदवण्यात आली आणि त्यांच्या नावावर पैसे काढण्यात आले, गावातील सर्व रहिवासी रोजगार हमीच्या कामाला उपस्थित राहत नाहीत. तथापि, कामावर उपस्थित न राहणाऱ्या सुमारे ३५ ते ४० व्यक्तींची उपस्थिती नोंदवहीत नोंद करण्यात आली आणि त्यांच्या नावाने पैसे काढण्यात आले. एकूणच, जे रहिवासी कधीही कामावर येत नाहीत किंवा बाहेर काम करतात त्यांचीही उपस्थिती नोंदवहीत नोंद करण्यात आली आणि पैसे काढण्यात आले अशी तक्रार नंदकिशोर रामटेके यांनी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण यांच्याकडे केली आहे.
याशिवाय मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेअंतर्गत एका मुलीला गावातील शाळेत दाखल करण्यात आले आहे. तिच्या नावाचा वापर करून रोजगार हमी निधी देखील काढण्यात आल्याचाही आरोप नंदकिशोर रामटेके यांनी केला आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सरपंचानी आरोप फेटाळले
पांदण रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार किंवा निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप चुकीचा आहे. शिवाय मजुरांची नावे नोंदवहीमध्ये आहे किंवा नाही ही जबाबदारी रोजगार सेवकाची असते सरपंच म्हणून मी फक्त स्वाक्षरी करण्याचे काम करतोअसै हिवराचे सरपंच भूपेंद्र नागफासे म्हणाले.
चौकशी समिती स्थापन
मनरेगा अंतर्गत हिवरा या गावात सुरू असलेल्या पांदण रस्त्याच्या कामात पैशांची अफरातफर आणि भ्रष्टाचार झाल्याची तक्रार प्राप्त झाली असून चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. एका आठवड्याच्या आत दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण यांनी सांगितले