गोंडवाना राजघाट अतिक्रमणाच्या विळख्यात

अर्ध्याहून अधिक राजघाटावर अतिक्रमण झाले आहे आणि उर्वरित जागाही हळूहळू अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत आहे

अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले गोंडवाना राजघाट. इन्सेटमध्ये चोरटय़ांनी फोडलेली समाधी.

शहराच्या स्थापत्यकाराच्या वंशजांना जिवंतपणीच नव्हे तर मृत्यूनंतर देखील मरणयातना भोगण्याची वेळ यावी, यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. नागपूर शहराचे स्थापत्यकार गोंड राजा बख्त बुलंद शाह यांच्यावर नागपूकरांनी ही वेळ आणली आहे. सक्करदरा परिसरातील गोंडवाना राजघाट अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

सक्करदरा परिसरात  राजे बख्त बुलंद शाह यांचा राजघाट आहे. याठिकाणी त्यांच्या राजघराण्यातील सदस्यांच्या समाधी आहेत. राज्यकारभार संपला आणि शहर आधुनिकतेकडे वळले. या राजघाटाचा साऱ्यांनाच विसर पडला आणि अक्षरश: समाधींवर लोकांनी घरे उभारली. हा संपूर्ण राजघाट मोठय़ा इमारतींच्या आणि झुडपी जंगलाच्या विळख्यात सापडला आहे. पूर्वी राजे समाधीमध्ये गुप्तधन ठेवायचे ही माहिती असल्याने हिरे शोधण्यासाठी रात्रीबेरात्री लोकांनी या समाधी फोडल्या. त्यावर असणारी मार्बलची दगडे चोरून नेली. दृष्टिपथास पडणाऱ्या १९ समाधी आता भग्नावस्थेत आहेत. अर्ध्याहून अधिक राजघाटावर  अतिक्रमण झाले आहे आणि उर्वरित जागाही हळूहळू अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत आहे.

वाईट बाब म्हणजे,  राजे बख्त बुलंद शाह द्वितीय यांचा मृत्यू झाला आणि त्यांना या राजघाटावर दफन करण्यासाठी आणले गेले तेव्हा स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला. अखेर त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याची खंत आजही राजमाता राजश्रीदेवी उईके यांना आहे. विशेष म्हणजे, ही जागा महापालिकेच्या अखत्यारित आहे, तरीही त्यांना शहराच्या स्थापत्यकाराची ओळख जपता येऊ नये, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेला ही बाब लक्षात आल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम यांनी व सहकाऱ्यांनी राजघाट शक्य  तेवढा स्वच्छ करून  ‘गोंडवाना राजघाट’ असा फलक लावला आणि राजघाटाच्या फाटकाला कुलूप लावले.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Encroachment in gondwana rajghat in sakkardara area