राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता
नागपूर : राज्यात मालवाहतुकीसाठी नवे रेल्वेमार्ग टाकण्यात येत असून नागपूर विभागात तिसरा आणि चौथ्या मार्गाचे काम सुरू आहे. परंतु रेल्वे रुळालगत अतिक्रमण असल्याने रेल्वेच्या मार्गात अडथळा निर्माण होत आहे. असा प्रकार केवळ नागपुरातच नाही तर देशात ८१४ हेक्टरवर अतिक्रमण असून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ५.३८ एकरवर अतिक्रमण झाले आहे.
रेल्वेला इटारसी ते बल्लारपूर (नागपूर मार्गे) तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग तयार करायचा आहे. त्याचे काम देखील सुरू झाले आहे. या रेल्वेच्या कामात रेल्वे रुळाशेजारी झालेल्या अतिक्रमणाचा अडथळा निर्माण होत आहे. विशेषत: गोधनी आणि चारगाव येथे मोठय़ा प्रमाणात रेल्वेच्या जमिनीवर घरे बांधण्यात आली आहेत. संपूर्ण विभागात १२१५ ठिकाणी अतिक्रमण असल्याचे दिसून आले आहे. या अतिक्रमणाने रेल्वेची २१८०० चौरस मीटर म्हणजे ५.३८ एकर जमीन व्यापली आहे. या वृत्ताला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून काही ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असल्याचे सांगितले. रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाची आहे. एवढय़ा प्रमाणात अतिक्रमण होत असल्यास आरपीएफने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ते रोखायला हवे होते. पण गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ दिले गेले. आता रेल्वेच्या प्रकल्पांना अडचण निर्माण होत असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण काढण्याची मोहीम राबण्यात येणार आहे.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या माहितीनुसार देशभरात रेल्वेच्या ८१४ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आहे. हे सर्व अतिक्रमण महानगरात रेल्वे रुळाच्या शेजारी झालेले आहेत. यामध्ये सर्वाधिक अतिक्रमण रेल्वेच्या उत्तर झोनमध्ये १७६ हेक्टरवर आहे. अतिक्रमणात दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण-पूर्व झोन १४१ हेक्टर आणि नार्थईस्ट फ्रंटीयर झोनध्ये ९४ हेक्टरवर अतिक्रमण आहे. या अतिक्रमणामुळे रेल्वेगाडय़ा, प्रवासी यांच्या सुरक्षेला धोका आहेच, पण झोपडपट्टय़ातील नागरिकांना देखील त्यांचा धोका आहे. शिवाय या अतिक्रमणामुळे नवीन मार्ग टाकण्यात अडचणी येत आहेत. रेल्वे जमिनीवरील अतिक्रमणाला संबंधित रेल्वे अधिकारी जबाबदार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात अलीकडेच म्हटले होते. तसेच रेल्वेच्या जागा मोकळय़ा करण्याचे निर्देश देखील दिले होते. परंतु रेल्वेने अद्यापही ते गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. गोधनी, चारगाव येथे अधिक अतिक्रमण आहे. इतर ठिकाणी थोडेफार अतिक्रमण आहे. ते सर्व अतिक्रमण टप्प्याटप्प्याने काढण्याची कारवाई करण्यात येईल. – ऋचा खरे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे.