उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन
नागपूर : प्रदूषणावर मात करून पर्यावरण सुरक्षित राखण्यासाठी लोकांना सहभागी करून घ्यावे लागेल. जोपर्यंत त्यांना सहभागी करून घेतले जाणार नाही, तोपर्यंत सकारात्मक परिणाम दिसून येणार नाहीत. त्यामुळे याबाबत होणारे संशोधन इंग्रजीव्यतिरिक्त भारतीय स्थानिक भाषांमध्येही यायला हवे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.
‘नीरी’च्यावतीने बुधवारी आयोजित ‘जीवशास्त्र, औषध आणि पर्यावरणातील धातू आयन आणि सेंद्रिय प्रदूषण’ या विषयावरील १५व्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘नीरी’चे संचालक डॉ. राकेश कुमार, परिसंवादाच्या अध्यक्ष डॉ. सोनाली खन्ना, अमेरिकेतील मिस्सीसिपी येथील जॅक्सन स्टेट युनिव्हर्सिटीच्या पर्यावरण आरोग्य केंद्राचे संचालक प्रा. डॉ. पॉल टेक्नोवोव, खासदार विकास महात्मे, केंद्रीय पर्यावरण विभागाचे डॉ. टी.के. जोशी उपस्थित होते. उपराष्ट्रपती म्हणाले, भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. लोकांना त्यांच्याच भाषेत संशोधन उपलब्ध झाले तर त्याचा परिणाम दिसून येईल. आपल्या शैक्षणिक यंत्रणेतही मातृभाषेवर इतका जोर दिला जात नाही, कारण आपल्याला इंग्रजीचे जास्त आकर्षण आहे. इंग्रजी भाषा वाईट नाही. परंतु मातृभाषा ही डोळ्यांची शक्ती आहे तर इतर भाषा या त्यावरील आवरणासारख्या म्हणजेच चष्म्यासारख्या आहेत. त्यामुळे ही सरकारची, यंत्रणेची जबाबदारी आहे की त्यांनी स्थानिक भाषांमध्ये गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवाव्यात.
यावेळी ‘जागृती – एक समाज, एक लक्ष्य’ या मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ‘नीरी’तर्फे जल व पर्यावरणासंदर्भात सुरू असलेल्या उपक्रमांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन त्यांनी केले. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘नीरी’ परिसरातील स्मृती वनमध्ये व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. राकेश कुमार व संचालन डॉ. अत्या कपले यांनी केले.
मी वेळेच्या खूप आधी पोहोचतो
मला एक वाईट सवय आहे. मी वेळेत कधीच पोहचत नाही तर वेळेच्या खूप आधी पोहोचतो. यामुळे संस्थेतील लोकांसोबत वेळ घालवता येतो आणि त्यांच्याबद्दल जाणून घेता येते. नाही तर तुम्हाला माहितीच आहे की, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचा राजशिष्टाचार काय असतो. ते कार्यक्रमात येतात. राष्ट्रगीत होते. ते संबोधित करतात. पुन्हा राष्ट्रगीत होते आणि ते निघून जातात. त्यामुळे मी शक्यतोवर प्रयत्न करतो की वेळेच्या आधी पोहोचायचे आणि संबंधितांशी संवाद साधायचा. ‘नीरी’तही मी अर्धा तास आधी पोहोचलो आणि संचालक व त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत संवाद साधला, असेही नायडू म्हणाले.