चंद्रपूर : गणपती विसर्जन मिरवणुकीत माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार असे भाजपचे दोन स्वागत मांडव होते. या स्वागत मांडवाचीच सर्वत्र चर्चा असताना आगामी महापालिका निवडणुकीत अशाच पद्धतीने दोन ‘मांडव’ लागले तर भाजपचा पराभव निश्चित आहे, अशी भीती आता माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. यातूनच भाजपचे अनेक माजी नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे कळते. भाजपमधील माजी नगरसेवकांची ‘सोनेरी टोळी’ हा विचार करीत आहे, अशी चर्चा आहे.
जिल्ह्यात एकसंघ दिसणारा भाजप पक्ष २०२४ लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून गटातटांत विखुरला आहे. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात द्वंद्व आहे. मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर व त्यांचे सुपुत्र रघुवीर अहीर जोरगेवार यांच्यासोबत आहेत. मात्र, अहीर यांचा गट जोरगेवार यांनी गिळंगृत केल्याने अहीर यांच्यासह त्यांचे समर्थकही प्रचंड अस्वस्थ आहेत. अशातच गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मुनगंटीवार व जोरगेवार समर्थकांनी दोन वेगवेगळे स्वागत मांडव उभारले. यावरून दोन्ही गटांत वादही झाला.
हा वाद वाढू नये म्हणून मांडवांभोवती पोलिसांचा बंदोबस्त होता. सुदैवाने कुठलाही वाद न होता गणपती विसर्जन शांततेत पार पडले. विशेष म्हणजे भाजपच्या या दोन मांडवापैकी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मांडवात अहिर यांचे सुपुत्र रघुवीर अहिर तर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मांडवात अहिर यांचा भाचा मोहन चौधरी होते. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबतच नातेवाईक देखील विखुरले गेले आहेत.मात्र, या मांडवांचे कवित्व भाजप, संघ स्वयंसेवक तथा विविध राजकीय पक्षांत सुरूच आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत अशाच पद्धतीने भाजपचे दोन ‘मांडव’ लागले तर कसे, असा प्रश्न आता माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना भेडसावू लागला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असून ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते.
भाजपतील ‘सुवर्ण टोळी’ अशी ओळख असलेल्या भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी तर काँग्रेस अध्यक्षांचा वाढदिवस एका हॉटेलात मोठ्या थाटामाटात साजरा केला होता.
दरम्यान, भाजप समर्थक तथा संघाचे स्वयंसेवक संदीप पोशट्टीवार यांनी, भाजप नेत्यांनी दोन मांडव लावण्यापेक्षा लोकांची कामे करावी, शहरातील समस्या सोडवाव्या, कार्यकर्त्यांच्या तीन पिढ्यांच्या त्यागानंतर भाजप सत्तेत आली आहे, त्यांच्या त्यागाचा सन्मान करा, असे सल्ले दोन्ही आमदारांना उद्देशून समाज माध्यमाद्वारे दिले.
एकमेकांना इशारे
गणपती विसर्जन मिरवणुकीत आमदार मुनगंटीवार यांनी ‘बाप तो बाप रहेगा’, ‘अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाये’, या गाण्यांवर ठेका दिला. दुसरीकडे, आमदार जोरगेवार यांनी ‘मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम हैं,’ या गाण्यावर नृत्य केले. या मध्यमातून दोन्ही नेत्यांना एकमेकांना इशारे दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.