अमरावती : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काही पुराव्यांचे सादरीकरण देखील केले. दरम्यान राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही एक खळबळजनक दावा केला आहे. विधानसभेच्या निवडणुकी आधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती, असे शरद पवार म्हणाले. त्यावर भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील खूप मोठे नेते आहेत. वडील म्हणूनच त्यांचा सन्मान मी करीत आली आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीने पत्रकार परिषदेत जर हा गौप्यस्फोट केला आहे, तर त्या दोन व्यक्ती कोण होत्या, हे देखील शरद पवार यांनी जाहीर केले पाहिजे. कारण जेव्हा लोकसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार महाराष्ट्रात निवडून आले, तेव्हा हा प्रश्न का उपस्थित करण्यात आला नाही, हा आमचा प्रश्न आहे.
विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजपचा मोठा विजय होतो, महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक भाजपच्या बाजूने उभे राहिले, तेव्हा हा प्रश्न का केला जात आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून अशा स्वरूपाची वक्तव्ये अपेक्षित नाहीत. अपेक्षित निकाल न लागल्याने त्यांच्या मनात कुठेतरी निराशा आली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर त्यामुळेच ते टीका करीत आहेत. लोकसभेच्या वेळी तुमच्या बाजूने निकाल आला, तर तेव्हा कोणी सेटिंग केली होती, असा सवाल नवनीत राणा यांनी केला.
नवनीत राणा म्हणाल्या, शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांत काहीही तथ्य नाही. विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने निराशेतून ही विधाने केली जात आहेत. पवारांनी सेटिंग घडवून आणणाऱ्या दोन्ही माणसांची नावे जाहीर करावीत, आमचे सरकार आणि निवडणूक आयोग त्यांची चौकशी करेल. यापूर्वीही निवडणूक प्रक्रियेविषयी अनेक आरोप करण्यात आले आहेत, पण त्यात काहीही आढळून आले नाही. माझा गळा कापण्याची धमकी मला देण्यात आली, पण मी घाबरणारी नाही. हिंदू धर्माचा आवाज मी बुलंद करीत राहणार आहे. भावाच्या हाताला राखी बांधणारे बहिणीचे हात तेवढेच सक्षम आहेत, हे सातत्याने दिसून आले आहे, असेही नवनीत राणा यांनी सांगितले.